जिल्हाधिकाऱ्यांची तत्त्वत: मान्यता
नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत शासनाने अंबरनाथ पालिका हद्दीसाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १ कोटी ४० लाख रुपये लवकरच पालिका प्रशासनास मिळणार असून त्यातून शहरातील दलित वस्त्यांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
अंबरनाथ पालिका हद्दीतील ३, ९, २७ आणि ३४ हे चार प्रभाग नागरी दलित वस्त्यांमध्ये मोडतात. जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांनी अलीकडेच घेतलेल्या आढावा बैठकीत या निधीस तत्त्वत: मान्यता दिली. या योजनेतून भुयारी गटार, रस्ता काँक्रीटीकरण, पदपथ, गटारे, शौचालये, समाजमंदिर आदी कामे करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी          दिली.