मराठवाडय़ात अनेकांना १०० दिवसात दामदुप्पट रक्कम देतो म्हणून फसविणारा अनिसोद्दीन कलिमोद्दीन सय्यद याला आर्थिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली. बीग लाईफ व्हेन्चर्स प्रा. लि. या नावे काढलेल्या कंपनीमार्फत एजंट नेमून आठ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल करणारा सय्यद व त्याचे साथीदार गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. रविवारी अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे तो उरुसानिमित्त गावी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली.
बीग लाईफ व्हेन्चर्स या कंपनीत गुंतवणूक केल्यास शंभर दिवसात दामदुप्पट रक्कम दिली जाईल, तसेच एजंटांना आकर्षक कमिशन दिले जाईल, असे भासविण्यात आले होते. काही दिवस काही जणांना रक्कमही दिली गेली. त्यामुळे सहा महिन्यात आठ ते १० कोटी रुपयांची उलाढाल या कंपनीने केली. लातूर येथे या कंपनीचे मुख्य ऑफिस होते. नाशिक येथील एका महिला एजंटामार्फत औरंगाबादमध्ये रमेश दिवटे व त्यांची साथीदारांनी रक्कम गुंतवली होती. ती परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याची तक्रारीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारावरून झालेला गुंता निस्तारण्यासाठी अनिसोद्दीन व त्याच्या सहकाऱ्यांनी धनादेशही दिले होते. मात्र रक्कम परत मिळाली नाही. कारण धनादेश वठले नाहीत. या कंपनीचे पाच अकाऊंट पोलिसांनी पूर्वीच सिल केले होते.