दोन वर्षांत गुंतवणुकीवर फ्लॅटसह दहापट रकमेचे आमिष दाखवून पाऊण कोटीने लुबाडणूक करणाऱ्या एका मुख्य ठगाला धंतोली पोलिसांनी अटक केली असून इतर पाच आरोपी फरार आहेत.
देवेंद्र सोनथोईर (रा. शिवशंभूनगर) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी मंगेश विठ्ठल खंगार (रा. सेलू जि. वर्धा), राजेश सुदाम अर्जतिवार (रा. खापरखेडा), अनिता जुगनाके (रा. पांढराबोडी), अशोक तेंडुलकर (रा. मेकोसाबाग, गौतमनगर) व सुरेंद्र हेमराज शर्मा (रा. सुदाम अपार्टमेंट, मानकापूर) या आरोपींच्या मदतीने यशवंत स्टेडियम परिसरातील शकुंतला अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर भूमी एम्पायर हाऊसिंग एजन्सी थाटली. स्वस्त दरात फ्लॅट/भूखंडांची जाहिरात दिल्याने अनेक गोरगरीब त्याकडे आकृष्ट झाले. राधा रंगलाल बडखाने (रा. खामला) या महिलेचाही त्यात समावेश होता. अनिता जुगनाके, अशोक तेंडुलकर व सुरेंद्र शर्मा हे एजंट तिच्या घरी गेले. त्यांनी विविध योजना सांगत एजंसीच्या कार्यालयात बोलावले. एका ओळखीच्या महिलेसोबत राधा तेथे गेली. कार्यालयातील झगमगाट व भरगच्च कार्यालय पाहून त्यांना हायसे वाटले. आरोपींनी राधाला वीस हजार रुपये भरून सदस्य होण्यास सांगितले.
पहिल्या सहा महिन्यात साडेसात हजार, त्यानंतर प्रत्येक सहा महिन्यांनी अनुक्रमे २२ हजार ५००, ५२ हजार ५००, १ लाख ५० हजार व दोन वर्षांनंतर २ लाख ३२ हजार रुपये परत दिले जातील. त्यासोबत शहरातील २५ किलोमीटर सीमेत दोन खोल्यांचा फ्लॅट दिला जाईल. फ्लॅटची किंमत मात्र हप्त्याने वसूल केली जाईल, असे आमिष दाखविण्यात आले. राधा व तिच्या मुलाला हिंगणाजवळ नेऊन जमीनही दाखविण्यात आली. २८ डिसेंबर २०१० रोजी तिने तेथे वीस हजार रुपये भरले. मुलगा मयूरच्या नावेही तिने वीस हजार रुपये भरले. त्यासाठी एजंटने वारंवार त्यांच्या घरी जाऊन आकृष्ट केले. पतीच्या निधनानंतर मिळालेल्या विमा परताव्यातून तिने ही रक्कम भरली. सहा महिन्यांनंतर ती पहिला परतावा घेण्यासाठी एजंसीच्या कार्यालयात गेल्या. प्रबंध संचालक बदलल्याने सहा महिन्यांनतर तीस हजार रुपये मिळतील, असे तिला तेथे सांगण्यात आले. मात्र, पहिल्या परताव्याची रक्कम न दिल्याने गुंतवणूकदारांची तेथे गर्दी झाली. त्यांना पुढील तारखा सांगून बोळवण करण्यात आली. त्या संबंधित दिवशी गुंतवणूकदार तेथे गेले तेव्हा कार्यालयाला कुलपे दिसली. एजंटच्या मोबाईलवर अनेकांनी संपर्क साधला असता ते बंदच होते. त्यांचा शोध सुरू केला असता राजेश त्यांच्या हाती लागला. सहा महिन्याच रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन तो पळून गेला.
राधाने घंतोली पोलीस ठाण्यात चाळीस हजार रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी सहही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता मुख्य आरोपी देवेंद्र त्यांच्या हाती सापडला. चारशेहून अधिक जणांची फसवणूक झाल्याची पोलिसांची माहिती आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Apr 2013 रोजी प्रकाशित
पाऊण कोटींनी फसवणूक करणारा सूत्रधार अटकेत, अन्य पाच फरार
दोन वर्षांत गुंतवणुकीवर फ्लॅटसह दहापट रकमेचे आमिष दाखवून पाऊण कोटीने लुबाडणूक करणाऱ्या एका मुख्य ठगाला धंतोली पोलिसांनी अटक केली असून इतर पाच आरोपी फरार आहेत.
First published on: 16-04-2013 at 05:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud mastermind arrested