बंगलोर येथील ग्रामीण फायनान्शियल सर्व्हिस कंपनीच्या राहाता शाखेतील चार कर्मचा-यांनी संगमनत करून २६ लाख १८ हजार रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी सुनील बडाख यांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कंपनीच्या या चार कर्मचा-यांविरुद्ध अपहारचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी या कंपनीचे राहाता शाखेतील कर्मचारी सचिन दिनकर शेळके (औरंगाबाद), सूर्यकांत प्रल्हाद डोखे (परभणी), सिद्धार्थ प्रल्हाद खंदारे (हिंगोली) व शादल अहमद शेख (नांदेड) यांच्याविरुद्ध  संगनमताने अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला.
क्षेत्रीय अधिकारी बडाख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की १० मार्च २०१२ ते २१ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत नोकरीत असताना सभासदांच्या नावे खोटी कागदपत्रे तयार करून त्याचा या चौघांनी कर्जासाठी वापर केला व कंपनीत २६ लाख १८ हजार रुपयांचा अपहार केला. यातील ९ लाख ९९ हजार ५४० रुपयांचे कर्ज कंपनीच्या लक्षात येऊ नये म्हणून सभासदांचे नाव स्वत: भरले. परंतु ही बाब वरिष्ठ अधिका-यांच्या लक्षात आली. २६ लाख रुपयांच्या अपहारातील १० लाख रुपयांचा भरणा वजा जाता १६ लाख ११ हजार रुपयांचा अपहार झाला असल्याचे क्षेत्रीय अधिकारी बडाख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या चौघांविरुद्ध पैशाचा अपहार केल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बंड हे करीत आहे.