सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी अखेर गुरुवारी दुपारी उशिरानंतर उजनी धरणातून साडेचार टीएमसी पाणी भीमा व सीना नदीच्या बोगद्यावाटे सोडण्यास प्रारंभ झाला. भीमेत पाच हजार क्युसेक्स तर सीना बोगद्यात ८०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. हे पाणी टाकळी येथे पाणीपुरवठा योजनेत पोहोचण्यास चार दिवसांचा अवधी अपेक्षित आहे. दरम्यान, येत्या शनिवारपासून शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाआडऐवजी दोन दिवसाआड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन करताना सोलापूर शहरासह विविध पाणी योजनांसाठी २४ टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी चार टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर गेल्या १ जानेवारी रोजी साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन होते. परंतु त्यानुसार कार्यवाही होत नव्हती. त्याचवेळी महापालिकेकडूनही टाकळी येथे भीमा नदीच्या पात्रात पाणीपातळी खालावली असताना त्याबद्दलची दक्षता घेतली गेली नाही. शेवटच्या क्षणी पाण्यासाठी प्रयत्न हाती घेण्यात आले. यात महापालिका पदाधिकाऱ्यांसह स्थानिक आमदारांची मोठी दमछाक झाली. अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उजनी धरणातून ठरल्याप्रमाणे साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे दिलासा मिळाला खरा, परंतु गुरुवारी दुपापर्यंत उजनी धरणातून पाणी सोडण्यात न आल्याने महापालिकेची यंत्रणा हवालदिल झाली होती. सुदैवाने उशिरा दुपारी चारनंतर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आणि सर्वानी समाधानाचा सुस्कारा सोडला.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या तोंडावर शहरावर जलसंकट कोसळल्याने व त्यात महापालिका पदाधिकारी व प्रशासनाचा हलगर्जीपणा नडल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशेषत: प्राप्त परिस्थितीत येत्या शनिवारपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापौर अलका राठोड यांनी जाहीर केल्यानंतर संतापलेल्या भाजप-सेना युतीच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापालिकेत महापौरांच्या मोटारीवर चढून ‘ठिय्या आंदोलन’ केले.
दरम्यान, शहरातील पाणीटंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी तीन कोटी ६४ लाखांच्या निधी उपलब्धतेस पालिका स्थायी समितीच्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती विनायक कोंडय़ाल यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा गुरुवारी दुपारी पार पडली. पाणीटचाईच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करणे, उजनी धरणात सोलापूर पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी चर खोदणे, पाणीपुरवठा योजनांतील विद्युतमोटारींची दुरुस्ती करणे, नळांची दुरुस्ती करणे आदी कामांसाठी प्रशासनाने तीन कोटी ६४ लाख खर्चाचा आराखडा मंजूर होण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब करून हा निधी प्राप्त होण्याची शिफारस महापालिका सर्वसाधारण सभेकडे केली आहे.