‘झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या’.. पूर्वी शाळांना उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा लागताच मुलांना मामाच्या गावाला अर्थात ‘आजोळी’ जायची ओढ लागत असे. मामाही भाचेकंपनीच्या स्वागतासाठी तयार असे; परंतु बदलत्या काळात काटकसरीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने मामाची गावे परकी झाली आहेत. ज्यांच्याकडे पैशाला कमी नाही अशांनी हवे त्या पर्यटनस्थळी जावे, हॉटेलमध्ये राहावे व मनसोक्त बागडण्याचा आनंद घ्यावा, असे चित्र सर्वत्र दिसून येते. उन्हाळ्यात घरात बसून किंवा मैदानाात जाऊन खेळणारे पारंपरिक खेळ आज खेळले जात नाहीत.
पूर्वी उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा हव्याहव्याशा वाटत असत, परंतु आता सुट्टय़ा आल्या की काय करावे, हा प्रश्न निर्माण होतो. पूर्वी उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा लागताच घरा-घरात अडगळीत पडलेले बुद्धिबळाचे पट, कॅरम बोर्ड व पत्त्यांचे कॅट बाहेर निघत असत. परंतु बदलत्या काळात संगणक व ‘व्हिडीओ गेम’चाच बोलबाला अधिक असून शहरी भागात सर्वच वयोगटांत याच वस्तू प्रिय झाल्याचे चित्र असले तरी भार नियमनाचा तडाखा बसलेल्या ग्रामीण भागात मात्र इलेक्ट्रॉनिक सेलवरील गेम, मोबाईल गेम खेळण्याकडे अधिक कल आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व शिबिरांचे पेव आले असून पालक अशा शिबिरांमध्ये मुलांना गुंतवून ठेवीत असतात. पूर्वीच्या लंगडी, लगोरी इत्यादी खेळांना कधीचीच सोडचिठ्ठी दिली आहे. सापसिडीसारखे घरात बसून खेळणारे खेळ कुठेतरी तुरळक दिसतात. काळाच्या ओघात उन्हाळय़ातील खेळ आता इतिहास जमा झाले आहेत. पूर्वी चार मुलांनी एकत्र जमायचे, बुद्धिबळ, कॅरम, पत्ते वाटलेच तर नवा व्यापार मांडायचा किंवा सापशिडीत मन रमवायचे. यातून बालमित्र अधिकाधिक जवळ येत असत. त्यातून एक प्रकारचे भावनिक नाते निर्माण होऊन ते संबंध आयुष्यभर जपले जायचे. पूर्वी मामाही आपल्या भाच्यांना आग्रहाने बोलावीत तर कधी स्वत:हून घेऊन जात असत. आब्यांचा रस करण्यासाठी मामा ढीगभर आंबे आणायचे. भरपेट जेवण झाल्यानंतर मुले वेगवेगळे खेळ मांडून जे बसायचे आणि ऊन उतरल्यानंतरच बाहेर पडायचे. परंतु आता त्या खेळांना मुले पसंत करीनासे झाले आहेत. शहरी भागात व्हिडीओ गेम आणि ग्रामीण भागात सेलवरील इलेक्ट्रॉनिक गेम, मोबाईल गेम खेळण्यावरच सध्याभर दिसतो.
गेल्या काही वर्षांत क्रिक्रेटचे फॅड आले असून त्याकडे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी वळू लागले आहेत. मुलांना क्रिकेटचे वेड लागले आहे. त्यामुळे उन्ह उतरताच मुले घरोसमोर किंवा मोकळ्या मैदानात जाऊन क्रिकेटचा आनंद घेत असतात. जी मन:स्थिती मुलांची झाली आहे तीच मुलींची झाली आहे. पूर्वी ठिकठिकाणी मुली लंगडी खेळताना दिसत असत. आता मात्र मुलींना लंगडी काय किंवा टिक्कर बिल्ला काय, हे माहीतही नाही. आजची मुले वाचनालयात जाऊन कोणतेही पुस्तक घरी आणत नाहीत. वाचन संस्कृतीच हरवल्यामुळे बहुतेक घरी साहित्य, संस्कृती यावर चर्चाच होत नाही. पाठांतर नावाचा प्रकारच मागे पडला असल्याने पहाट कोणालाच माहीत नाही. टीव्ही पाहात रात्री उशिरापर्यंत जागायचे अन् ऊन अंगावर आले की उठायचे. दिवसभर एकलकोंडे व्हिडीओ, मोबाईल गेम खेळायचे अन् आला दिवस ढकलायचा असेच वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. याला काहीजण अपवादही असू शकतात. जसा काळ बदलत आहे त्याप्रमाणे जीवनमानही बदलत आहे. जुने खेळ लोप पाऊन नवीन नवीन खेळ पुढे येत आहेत. असे असले तरी आजही आपल्या नातवाने उन्हाळय़ाच्या सुट्टीत मामाच्या गावाला जावे, अशी बहुतांश आजीची इच्छा आहे. परंतु काळाच्या ओघात मामा-भाच्यांच्या प्रेमाला कुठेतरी सीमा येत असल्याचे चित्र समोर येत आहे.