गेली पाच वर्षे कळंबोली वसाहतीमधील लोकांना दिवसातून किमान तीन वेळा वीज गायब होण्याचा सामना करावा लागत असे. यामुळे या नोडमधील २० हजार ग्राहकांची विजेची उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र १९ एप्रिलपासून स्वतंत्र वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यास महावितरणने प्रारंभ केल्यामुळे आता कळंबोलीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
महावितरण कंपनीकडे राजकीय व सामाजिक संघटनेने पाठपुरवा केला होता. महावितरण कंपनीने कळंबोलीकरांना सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ाच्या समस्येतून सोडविण्यासाठी तळोजा येथील २२ केव्ही उपकेंद्रातून तळोजा ते कळंबोली या साडेसहा किलोमीटरच्या पल्ल्यावर भूमिगत वीजवाहिनी टाकली आहे. ही वीजवाहिनी कळंबोलीकरांसाठी विजेचे वरदान ठरणार आहे. कोणताही गाजावाजा न करता १९ एप्रिलला या वाहिनीतून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजप्रवाह सुरू केला. तेव्हापासून कळंबोलीकरांना अखंडित वीजपुरवठा मिळू लागला. २० हजार वीजग्राहक असलेल्या कळंबोली वसाहतीचे दुखणे विजेबाबत इतर वसाहतींच्या तुलनेत निराळे होते. विजेचे बिल इतर वसाहतींप्रमाणे येत होते, मात्र वीज कधी गायब होईल याचा नेम नव्हता. ग्राहकांसारखीच महावितरण कंपनीत काम करणाऱ्यांची परिस्थिती होती. तळोजा येथील उपकेंद्रातून येणाऱ्या विजेच्या तारा जीर्ण झाल्या होत्या. एखाद्या कावळ्याने चोच मारली तरीही वीजपुरवठा खंडित व्हायचा.
पाच वर्षांपूर्वी ही वीज समस्या अधिकच गंभीर बनली होती. ही समस्या सोडविण्यासाठी त्यावेळचे शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख चंद्रशेखर सोमण यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी या प्रश्नी ‘महावितरण’च्या स्थानिक अभियंता जी. व्ही. कोसगी, उपकार्यकारी अभियंता आर. व्ही. पवार ते मुख्य अभियंता सतीश करपे यांच्यापर्यंत जाऊन ग्राहक आणि अधिकारी यांच्या बैठका लावल्या. त्यानंतर कळंबोलीकरांसाठी स्वतंत्र भूमिगत वीजवाहिनीसाठीचा महावितरणच्या स्थानिक कार्यालय ते प्रकाशगड असा फाईलबंद प्रस्तावाला सुरुवात झाली. प्रस्ताव आणि मंजुरीपर्यंत महावितरणच्या या सर्व अधिकाऱ्यांची बदली झाली. पुन्हा दोन वर्षे हा प्रस्ताव धूळ खात पडला होता. नुकतेच कळंबोली वसाहतीमध्ये नीलसिद्धी प्रकल्पामध्ये विजेच्या मंजुरीच्या वादविवादाचा तेढ सुटल्याने कळंबोलीकरांना स्वतंत्र भूमिगत वीजवाहिनी मिळेल हे स्पष्ट झाले होते. महावितरणचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे या वीजवाहिनीचे काम पाच महिन्यांपूर्वी सुरू झाले. मात्र सिडको, एमआयडीसी, रेल्वे, स्टील बाजार समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या खोदकामाच्या परवानग्या मिळाल्यानंतर कळंबोलीचे कनिष्ठ अभियंता अमित पालवे, उपकार्यकारी अभियंता राजीव रामटेके आणि कार्यकारी अभियंता दिलीप मेहेत्रे यांनी ही वीजवाहिनी भूमिगत टाकण्याचे काम कंत्राटदाराकडून पूर्ण करून घेतले. १९ एप्रिलपासून या वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे २१ एप्रिलनंतर उन्हाळ्यात विजेची मागणी अधिकची असूनही एकदाही कळंबोलीकरांना खंडित वीजपुरवठा झाला नाही.
कळंबोली वसाहतीमधील वीज समस्या सुटली तसेच रोडपाली येथील सेक्टर २० येथे महावितरण कंपनी उपकेंद्राची उभारणी करत आहे. पुढील सात महिन्यात या केंद्राचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची आहे. या केंद्रात खारघर उपकेंद्रातून वीज मिळणार आहे. सध्या रोडपाली नोडमध्ये कळंबोली उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. रोडपालीचे उपकेंद्र सुरू झाल्यास त्याचा लाभ कळंबोलीच्या लोकांना होऊ शकतो. तळोजातून एखाद्या विजेच्या समस्येवेळी रोडपाली उपकेंद्र ही पर्यायी व्यवस्था होऊ शकते.   
कळंबोलीकरांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अजय सूर्यवंशी आणि कळंबोली फोरमचे काही कार्यकर्ते मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता कळंबोली उपकेंद्राच्या कार्यालयात जाऊन महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिलीप मेहेत्रे व इतर अधिकाऱ्यांचा सत्कार करणार आहेत.