मराठवाडय़ात रस्त्यांची समस्या गंभीर आहे. ती सोडवता आली नाही, कारण रस्त्यांसाठी पुरेसा निधी मिळाला नाही, अशी कबुली राष्ट्रवादीचे मराठवाडा विभागाचे प्रवक्ते आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. दरवर्षी त्यांच्यामार्फत ‘मराठवाडय़ाचा युवा वक्ता’ हा कार्यक्रम घेतला जातो. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बठकीत ते बोलत होते. मात्र, रस्त्यांची ही स्थिती लवकरच बदलेल. जूनपर्यंत रस्त्यांची कामे हाती घेतली जातील, त्यासाठी सुमारे ६ हजार कोटी रुपयांची तरतूद नुकतीच झाल्याचा दावा आमदार चव्हाण यांनी केला.
 राजकीय प्रश्नांना उत्तरे देताना आमदार चव्हाण म्हणाले, की आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून आश्वासनांची पूर्तता होणार नाही. लोक त्यांना काही दिवसांत जाब विचारतील. तेव्हा हे सरकार अपयशी आहे, असे वाटू लागेल असे चव्हाण सांगत होते. त्यावर आघाडी सरकारलाही लोक जाब विचारतील तेव्हा काय उत्तरे असतील, असे विचारले असता ते म्हणाले, सिंचनावर कितीही प्रश्नचिन्ह उभे केले असले, तरी सिंचनक्षमतेत वाढ झाली आहे. त्याची आकडेवारीही देता येईल. तथापि रस्त्यांचा प्रश्न मराठवाडय़ात गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्तेबांधणीसाठी निधी नसल्याने ही अवस्था झाली आहे. आता निधी आला असल्याने जूनअखेपर्यंत रस्ते अधिक चांगले होतील. शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये आमदार निधीतून दिल्याचेही त्यांनी सांगितले. विधी विद्यापीठाच्या अनुषंगाने आता नव्याने कायदा झाला आहे. राष्ट्रीय विधी विद्यालयाच्या निकषानुसार मुंबई आणि औरंगाबाद येथेच प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये यासाठी जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे विधी विद्यापीठ लवकरच सुरू होईल, असेही ते म्हणाले. मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नावर मराठवाडय़ातील सर्व आमदार विधिमंडळात एकत्र लढल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, या लढाईत शिवसेना-भाजपचे आमदार मात्र आक्रमक नव्हते. त्यांची भूमिकाही आम्हालाच वठवावी लागल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. ऊर्जाक्षेत्रातही मोठी गुंतवणूक केल्याचा दावा त्यांनी केला. मराठवाडय़ासह राज्यात सिंचनक्षमतेत मात्र वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला.