जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरणामुळे भारतीय समाजाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळेच भारतीय समाजमनाची मुस्कटदाबी होत आहे. महासत्तेच्या ध्यासापेक्षा गरिबांची भूक महत्त्वाची, असे मत ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. देश एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न पाहात आहे. मात्र, देश महासत्ता नाही झाला तरी चालेल. परंतु या देशातील माणसे भुकेने तडफडून मरता कामा नयेत, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉ. कोत्तापल्ले म्हणाले.
राजर्षी शाहू महाविद्यालयात आयोजित नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत ‘साहित्य संस्कृती व आजचा समाज’ या विषयावर डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, संस्थाध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे, प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. गणेश शिंदे यांची उपस्थिती होती. डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, की विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर, बहुआयामी व बहुश्रुत होणे गरजेचे आहे. त्याशिवाय आजचा विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही. जागतिकीकरणाच्या धोरणामुळे समाजात भांडवलदारांचा व श्रीमंताचा मोठा वर्ग वेगाने वाढतो आहे. तितक्याच वेगाने प्रचंड मोठा समुदाय दरिद्री होत आहे. भारतीय बाजारपेठेत सर्वच वस्तू परदेशी येत आहेत. त्यामुळे भारतीय उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. यात भारतीय समाजमनाची मुस्कटदाबी होत आहे, असे सांगून आजच्या समाजाची दुरवस्था डॉ. कोत्तापल्ले यांनी अधोरेखित केली. डॉ. वानखेडे यांचेही भाषण झाले. मोहन मोरे यांचा शांतिदूत धम्म गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप डॉ. शिंदे यांनी केला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. घुले यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. कल्याण गोपणर यांनी केले. प्रा. अरविंद हनुमंते यांनी आभार मानले. शहरातील साहित्यिक, नागरिक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.