कल्याण रेल्वे स्थानक प्रवेशद्वारातून बाहेर पडताच ऐतिहासिक कल्याण शहरात प्रथम कचऱ्याने भरलेल्या, दरुगधीयुक्त कचराकुंडय़ा नागरिकांचे स्वागत करतात. वर्षांनुवर्षांचे हे दृश्य बदलण्यासाठी रेल्वे स्थानक भागात एकही कचराकुंडी ठेवू नका. या भागात घंटागाडी फिरवून व्यापाऱ्यांकडून कचरा गोळा करा, अशा सूचना आमदार नरेंद्र पवार यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत.
शहर परिसरातील विकास कामांबरोबर सार्वजनिक स्वच्छतेला आपण महत्त्व देणार आहोत. कल्याण ऐतिहासिक शहर असल्याने शहरात नव्याने येणारे नागरिक कुतूहलाने शहरातील नावीन्य शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ऐतिहासिक कल्याणचे अवशेष नाहीच पण शहराच्या प्रवेशद्वारावर दरुगधीयुक्त कचराकुंडय़ांचे दर्शन घडते. कल्याणमधील बकालपणाचा एक चुकीचा संदेश सर्वत्र पोहोचतो. कल्याण पश्चिम, पूर्व भागात रेल्वे स्थानक भागातील सगळ्या कचराकुंडय़ा पालिका प्रशासनाने उचलून त्या अन्यत्र हलवाव्यात. रेल्वे स्थानक भागातील व्यापाऱ्यांना दुकानातील कचरा टाकण्यासाठी सकाळी, संध्याकाळी पालिकेकडून घंटागाडी फिरवण्यात यावी. घंटागाडी आल्यानंतर व्यापारी दुकानातील कचरा
त्या गाडीत टाकतील. कुणीही व्यापारी रस्त्यावर, कोपऱ्यात कचरा टाकणार नाही. अशी व्यवस्था करण्यात येणार आहे, असे पवार म्हणाले.
पर्यायी जागा देऊन रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अधिकृत फेरीवाला संघटनांशी चर्चा करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.