जगातील कोणतीही व्यक्ती मुंबईत फिरायला आली की ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या पाश्र्वभूमीवर एक फोटो हमखास काढलाच गेला पाहिजे असा जणू अलिखित नियमच. हा फोटो म्हणजे मुंबईतील अविस्मरणीय आठवणच असते. ही आठवण आता आणखी अविस्मरणीय होणार आहे. कारण येत्या शुक्रवारपासून मुंबईच्या या प्रवेशद्वाराला नवी झळाळी मिळणार आहे. तब्बल एक कोटी ४५ लाख शेड्स असलेले लाईट्स गेट वे भोवती लावले जाणार आहेत.
‘गेट वे’चा परिसर उजळून काढण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि ‘फिलिप्स इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ’न्यू लाइट’ मोहीम आखण्यात आली आहे. ‘गेट वे’चे वास्तुवैशिष्टय़ लक्षात घेऊन दिव्यांची रंगसंगती करण्यात येणार आहे. या नव्या, अनोख्या प्रकाशयोजनेमुळे गेट वे पर्यटकांच्या कायम स्मरणात राहील, असा विश्वास एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांनी व्यक्त केला. तर या प्रकाश योजनेतील आधुनिक तंत्रामुळे वीज बिल अगदी निम्म्यावर येईल, असा दावा पाटील आणि फिलिप्स लायटींगचे मार्केटिंग प्रमुख सुमीत जोशी यांनी केला.
या प्रकाश योजनेमध्ये २० प्रकारची एलईडी उपकरणे वापरण्यात आली आहेत. या उपकरणांमुळे वीजबचत होतेच; शिवाय प्रकाशाचा वेगळा अनुभवही घेता येतो, असे ‘फिलिप्स’चे रोहित दुबे यांनी सांगितले. गेट वे ऑफ इंडिया प्रकाशमान करण्यासाठी तयार करण्यात आलेले दिवे आणि ते चालविण्यासाठी वापरावे लागणारे संगणकीय सॉफ्टवेअर फिलिप्सनेच तयार केल्याचेही दुबे म्हणाले. फिलिप्सने यापूर्वी दिल्लीच्या राजपथावरील ‘इंडिया गेट’वर अशीच रोषणाई केली होती, अशी माहिती सुमीत जोशी यांनी दिली.
 या नव्या प्रकाश योजनेमुळे आता गेट वे ऑफ इंडियाचे खांब आणि परिसर आता रंगबिरंगी होणार असून प्रत्येक रंगाच्या अनेक छटा पाहायला मिळणार आहेत. एलईडी दिव्यांच्या माध्यमातून दिव्यांची रोषणाई काय किमया करू शकते याचा प्रत्यय पर्यटकांना घेता येईल.
प्रज्वलित करा तुमच्या आवडीचा दगड
गेट वे ऑफ इंडियामध्ये एखादा दगड तुम्हाला प्रज्वलित करायची इच्छा असेल तर तेही तुम्हाला शक्य आहे. यासाठी फिलिप्स आणि एमटीडीसीने http://www.mumbaiinanewlight.com  नावाचे संकेत स्थळ सुरू केले आहे. यावर तुम्हाला अमुक एका दगडाला अमुक शेड्सचे दिवे लावावे असे सांगता येते. याचबरोबर मुंबई अधिक आकर्षति करण्यासाठी तुम्ही तुमच्या कल्पनाही शेअर करू शकणार आहात.