‘धारावी’ नावामुळे संक्रमण शिबिरात जाण्यास रहिवाशांचा नकार ’ ६०० घरे रिकामी
नावात काय आहे? असे शेक्सपीअर म्हणून गेला असला तरी नावाचा महिमा वारंवार अनुभवायला मिळत असतो. नावाचा असाच फटका ‘म्हाडा’च्या शीव स्थानकासमोरील संक्रमण शिबिराच्या वसाहतीस बसत आहे. या वसाहतीस धारावी संक्रमण शिबीर असे नाव असल्याने या शिबिरात जाण्यास लोक सरळ नकार देत आहेत. त्यामुळे या शिबिरातील सुमारे ६०० घरे विनावापर पडून आहेत. आता या घरांचा वापर व्हावा यासाठी नामांतराचा तोडगा काढण्यात आला आहे.
मुंबईत ‘म्हाडा’ची ५० हून अधिक ठिकाणी संक्रमण शिबिरे असून त्यात सुमारे २० हजार कुटुंबे राहतात. ‘म्हाडा’च्या अधिकृत आकडेवारीप्रमाणे त्यात सुमारे आठ हजार घुसखोर आहेत. मात्र, पात्र रहिवाशांची यादी तयार करण्यासाठी ‘म्हाडा’ने राबवलेल्या मोहिमेत सुमारे साडेसात ते आठ हजार अर्ज आले. त्यामुळे संक्रमण शिबिरांत सुमारे १२ हजार घुसखोर असल्याचा अंदाज आहे. इमारत धोकादायक झाल्यास वा पुनर्वसनासाठी इमारत पाडल्यास अशा रहिवाशांना संक्रमण शिबिरांत हलवले जाते. ‘म्हाडा’ने संक्रमण शिबिरांत हलवलेल्या मूळ रहिवाशांच्या अर्जाची छाननी करून पात्रता यादी (मास्टर लिस्ट) निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सध्या घुसखोरी झालेल्या घरांमधून अशा अनधिकृत रहिवाशांना बाहेर काढेपर्यंत ‘म्हाडा’ला नवीन संक्रमण शिबिरांचा आसरा घ्यावा लागतो.
शीव स्थानकाजवळ असे संक्रमण शिबीर आहे. यात ६०० घरे आहेत. पण जवळच धारावी असल्याने या संक्रमण शिबिरालाही धारावी संक्रमण शिबीर असे नाव ‘म्हाडा’च्या दप्तरी नोंदले आहे. त्यामुळे एखाद्या प्रकरणात रहिवाशांना संक्रमण शिबरात हलवण्याची वेळ येते तेव्हा ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी धारावी संक्रमण शिबिराचे नाव घेतले की रहिवासी एकत्र येऊन तेथे जाण्यास थेट नकार देतात. वारंवार असे अनुभव आले असून त्यामुळे वसाहत जवळपास रिकामी पडली आहे.
केवळ नावामुळे ही समस्या निर्माण झाल्याने आता ‘म्हाडा’च्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती प्रसाद लाड यांनी या वसाहतीचे नामांतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने करण्याचा उपाय सुचवला आहे. तशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवले आहे. वसंतराव नाईक संक्रमण शिबीर असे नाव झाले की लोकांच्या मनातील ‘धारावी’ शब्दाबद्दलचा नकार निघून जाईल आणि ही ६०० घरे वापरात येतील, असा त्यांचा विश्वास आहे.