प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेल्या गोदा उद्यानाच्या कामास नवीन वर्षांचा मुहूर्त मुक्रर करण्यात आला असून प्रकल्पातील पहिल्या टप्प्यासाठी पाटबंधारे विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्याची कोणतीही गरज नसल्याचे सत्ताधारी मनसेने म्हटले आहे. गोदावरीच्या प्रवाहात अवरोध निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकल्प अन् बांधकामावर आजवर आक्षेप घेणारा पाटबंधारे विभाग या उद्यानाच्या प्रस्तावाची प्रतीक्षा करत आहे. हा प्रस्ताव मिळाल्यावर त्याचा अभ्यास करून या प्रकल्पास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ द्यायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे या विभागाने आधीच सूचित केले होते. असे असताना महापालिकेने आता त्या विपरित भूमिका घेत हे काम पुढे नेण्याचा मनसुबा जाहीर केला आहे.
साधारणत: दोन महिन्यांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गोदा उद्यान प्रकल्प संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले होते. जवळपास एक दशकापासून रखडलेला हा प्रकल्प रिलायन्स फाऊंडेशनमार्फत विकसीत केला जाणार आहे. सांस्कृतिक, पर्यावरण अनुकूल, कला आणि क्रीडा या चार संकल्पनांवर आधारीत हा प्रकल्प सध्या होळकर पूल ते आसारामबापू पूल या दरम्यानच्या पालिकेच्या ताब्यातील जागेत साकारण्याचे प्रयोजन आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा आर्थिक भार फाऊंडेशन पेलणार असल्याने सत्ताधारी मनसे-भाजप आघाडीची हे काम शक्य तितक्या लवकर सुरू करण्याची धडपड आहे. या घडामोडीत ज्या गोदाकाठावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे, म्हणजे या परिसरावर ज्यांची मालकी आहे, तो पाटबंधारे विभाग मात्र अनभिज्ञ आहे. गोदा उद्यानाविषयी कोणताही प्रस्ताव महापालिका वा फाऊंडेशनने पाटबंधारे विभागास पाठविलेला नाही. याबाबत जी काही माहिती मिळते, ती प्रसारमाध्यमांकडून या विभागाला समजत आहे. या संदर्भात नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील बाफना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले.
नदीकाठावर कोणतेही बांधकाम करावयाचे असल्यास पाटबंधारे विभागाकडून ‘ना हरकत दाखला’ आधी प्राप्त करावा लागतो. ही मान्यता घेतल्याशिवाय गोदा उद्यानाचा प्रकल्प साकारता येणार नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी यापूर्वी झालेल्या चर्चेत संबंधित प्रस्ताव फाऊंडेशनकडून दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी फाऊंडेशन आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले. नदीपात्राच्या संरक्षणाला महत्तम प्राधान्य आहे. प्रकल्पामुळे नदीच्या प्रवाहात काही अडथळे येतील काय, याची शहानिशा करूनच काय तो निर्णय घेतला जाईल, अशी पाटबंधारे विभागाची भूमिका आहे.
या एकूणच परिस्थितीत नवीन वर्षांच्या सुरूवातीला रिलायन्स फाऊंडेशन हे काम सुरू करणार असल्याचे महापौर अॅड. यतिन वाघ यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात कोणतेही पक्क्या स्वरुपाचे बांधकाम नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाकरवी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची कोणतीही गरज भासणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील टप्प्यात ज्या ठिकाणी अशी आवश्यकता भासेल तिथे ही परवानगी घेतली जाईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. म्हणजे, जानेवारीमध्ये सुरू होणाऱ्या गोदा उद्यानाच्या कामात पाटबंधारे विभागाचा कोणताही संबंध राहणार नसल्याचे महापालिकेने अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2013 रोजी प्रकाशित
हरकत फारकत
प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेल्या गोदा उद्यानाच्या कामास नवीन वर्षांचा मुहूर्त मुक्रर करण्यात आला

First published on: 28-12-2013 at 01:13 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goda park dont need no objection certificate mns