गोकुळने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपल्या कार्यक्षेत्रात विविध योजना राबवून दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती चांगल्याप्रकारे साधली आहे. यामध्ये शेतकऱ्यांची सेवा हा उद्देश गोकुळने साध्य केलेला आहे, असे उद्गार ‘इफ को फार्म फॉरेस्टी’ या संस्थेचे अध्यक्ष जी.पी.त्रिपाठी (नवी दिल्ली) यांनी गोकुळला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले. त्यांच्या समवेत या संस्थेचे संचालक तसेच अधिकारी उपस्थित होते.    
त्रिपाठी म्हणाले,‘‘इफकोशी संलग्न असणाऱ्या या संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी विकासाच्या योजना संपूर्ण देशभर राबविल्या जातात. त्यामध्ये देशाच्या विविध भागामध्ये हजारो एकरावर वृक्ष लागवड केलेली आहे. भविष्यात या संस्थेमार्फत शेतकऱ्यांकरिता संपूर्ण देशभर दूध प्रकल्प उभे करण्यात येणार आहे. आय.एफ.एफ.डी.सी.नवी दिल्ली ही संस्था देशामध्ये दूध प्रकल्प उभा करणार आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
या वेळी या संस्थेचे व्यवस्थापक एस.के.नांगीया यांनी गोकुळ दूध प्रकल्प पाहून आम्ही अत्यंत आनंदी झालेलो आहेत, असे स्पष्टीकरण दिले. या ठिकाणची स्वच्छता, कार्यक्षमता अत्यंत उत्कृष्ट असून उत्पादित होणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता उत्तम दर्जाची आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी आय.एफ.एफ.डी.सी.च्या संचालिका शांताराव, नारायणलाल अहिर, लखनसिंग, गोकुळचे महाव्यवस्थापक आर.सी.शहा तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.