निसर्गाच्या अवकृपेने कधी ओला, तर कधी कोरडय़ा दुष्काळाचा सामना जिल्ह्य़ातील बळीराजाला करावा लागतो. यातच यंदा पाऊस लांबल्याने रोवण्याही चांगल्याच रखडल्या होत्या, परंतु जुल व ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात चांगलाच पाऊस झाल्याने सध्या जिल्ह्य़ातील रोवण्या अंतिम टप्प्यात असून जिल्हा कृषी विभागाने ठरवून दिलेल्या लागवड उद्दिष्टाच्या ९५ टक्के धानपिकांच्या रोवण्या आटोपल्या आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाऊस न आल्याने बळीराजा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात पावसाने दडी मारल्याने झाली. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या, पण उशिरा का होईना जुलच्या शेवटी पेरणी करण्याइतपत पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने बळीराजावर दुबार पेरणीचेही संकट ओढवले होते. त्यानंतरही रोवण्या लांबणीवर गेल्या. दरवर्षी जुलमध्ये रोवणी प्रक्रिया आटोपली जाते, परंतु यंदा ती लांबली. १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्य़ातील ९५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभाग जवळपास २ लाख २० हजार हेक्टरवर धानासह तूर, मूग, तीळ आदी पिकांच्या लावगडीचे नियोजन करते. यापकी १ लाख ८८ हजार हेक्टरवर धानपीक लावण्यात येते. विशेष म्हणजे, जिल्ह्य़ात खरीप व रब्बी हंगामात धानपिकाचे उत्पादन घेण्यात येत असून शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. या हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असते, परंतु गेल्या काही वर्षांंपासून रासायनिक खतांचे वाढलेले दर व सततच्या नापिकीने शेतकरी बेजार झाला आहे.
असे असले तरी यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात सोडली तर आतापर्यंत पाऊस चांगला पडला आहे. या पावसाने जिल्ह्य़ातील तलाव, लहान-मोठी धरणे भरलेली आहे, परंतु गेल्या आठ-दहा दिवसांपासून वातावरण चांगलेच तापत असून शेतजमिनी कोरडय़ा झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांना मोटारपंपाने पाणी देण्याची वेळ आली आहे. रोवणी प्रक्रियेनंतर काही ठिकाणी कीडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कृषी विभागात कीटकनाशक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे. धान पिकाच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठय़ा प्रमाणात वापर करतात. गेल्या काही वर्षांंपासून या खतांच्या किमती गगनाला भिडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. रासायनिक खतांच्या किमतींवर नियंत्रण राहावे, यासाठी कृषी विभाग सजग असला तरी शेतकऱ्यांना योग्य त्या भावाने खते उपलब्ध होत नाहीत. त्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूकच होत असल्याने रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.