मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी येथे जाहीरपणे व्यक्त केली.
शहरातील काही डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या वैद्यकीय सेवेचा प्रारंभ करताना मुंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजेश टोपे होते. मुंडे म्हणाले, की देशातील लोकसंख्या वेगाने वाढत असून, येत्या काही वर्षांत आपण चीनलाही मागे टाकणार आहोत. वाढत्या लोकसंख्येमुळे जनहिताच्या अनेक योजना निष्प्रभ ठरत असून, आणीबाणीच्या काळात कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेची जनतेला एवढी भीती वाटत असे, की त्या वेळी समोर पोलीस दिसला की लोक पळून जात असत.
आणीबाणीच्या काळात आपण तुरुंगात होतो. परंतु हा तुरुंगवास काही चोरी केल्यामुळे नव्हता. नाहीतर वर्तमानपत्रांतली मंडळी तसे काहीतरी छापतील आणि त्यामुळे आपले मुख्यमंत्रिपद जाईल, अशी मल्लिनाथी त्यांनी हसत हसत केली. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मुंडे म्हणाले, की आपण लोकसभेची निवडणूक लढविणार आहोत. नंतर राज्यात येता येईल. जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसाठी विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्याशिवाय आणखी काही इच्छुक आहे काय, तसेच तसा बदल होण्याची शक्यता आहे काय, असे विचारले असता मुंडे यांनी याबाबत आपण काही बोलू इच्छित नाही. कारण उमेदवार ठरविण्याचा अधिकार पक्षाच्या संसदीय मंडळाचा आहे. अगदी माझ्या उमेदवारीचा निर्णयही संसदीय मंडळच घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य सेवा प्रारंभाच्या कार्यक्रमास शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी जायकवाडीच्या वरच्या भागातून पाणी सोडताना मराठवाडय़ावर अन्याय होत असून, यासाठी सर्व पुढाऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुंडे म्हणाले, की पाणी सोडण्याची मराठवाडय़ाची मागणी कायदेशीर आहे. सध्याच पाणी सोडले तर चांगले होईल. लोकसभेसाठी शिवसेना-भाजप यांच्यातील जागावाटपाचे सूत्र मागीलप्रमाणेच राहणार असून, त्यातूनच रिपब्लिकन पक्षाला जागा सोडण्यात येईल, असेही मुंडे म्हणाले. शिवसेना व मनसे यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न आपण केले होते. परंतु ते आता सोडून दिले आहेत. तसेच उद्धव ठाकरे व मनोहर जोशी यांच्या वादात आपण पडू इच्छित नसल्याचेही त्यांनी सांगितले.