निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी सचित्र करण्याचे निर्देश दिल्याने जुन्या यादीतील दीड लाखांवरील मतदारांची छायाचित्रे कुठून आणावी, असा प्रश्न निवडणूक विभागाला पडला आहे.
आयोगाच्या सूचनेवरून निवडणूक विभागाने मतदारांना त्यांची छायाचित्रे आणून देण्याचे आवाहन केले, पण मतदारांनी ते गांभीर्याने घेतले नसल्याने मोजक्याच मतदारांची छायाचित्रे जिल्हा निवडणूक विभागाकडे आली आहेत. मतदार यादीतून मतदारांची छायाचित्रे घेण्याचा पर्याय आयोगाने प्रशासनाला दिला, परंतु सर्वसाधारण मतदार यादीतही अनेक छायाचित्रे नाहीत. त्यामुळे पदवीधर मतदारांची छायाचित्रे गोळा करताना प्रशासनाची दमछाक होणार आहे. जुन्या यादीत १ लाख ८३ हजार मतदारांची नावे आहेत. यापूर्वी दर सहा वर्षांनी ही यादी नव्याने तयार करण्यात येत होती. त्यामुळे प्रत्येक पदवीधर मतदाराला त्याच्या नावाची नव्याने नोंद करावी लागत होती. यावर्षी ही यादी नव्याने तयार करण्याची गरज नाही, पदवीधरांच्या यादीतील जुनी नावे कायम ठेवता येतील, असे न्यायालयाने निर्देश दिले. सध्या मतदार नोंदणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात निवडणूक असल्यामुळे प्रशासनाकडे वेळ आहे. ही निवडणूक आटोपल्यानंतरच पदवीधरांच्या यादीचे काम हाती घेतले जाणार आहे. अपुरे मनुष्यबळ व आयोगाने वेळोवेळी त्यांच्या नियमात बदल केल्याने कामात वाढ झाली, परंतु पूर्वीपेक्षा कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वाढीव कामे करताना प्रश्न पडत आहे.
पदवीधर मतदारसंघात यंदा ९७ हजार मतदार वाढले आहेत. पूर्वीचे १ लाख, ८३ हजार, ७२६ आणि नव्याने नोंदणी केलेले मिळून यादीतील मतदारांची संख्या २ लाख, ८१ हजार, ६६९ झाली आहे. ही वाढ ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या नोंदणी दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयात २९ हजार ५४६, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३१ हजार ९८८, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात ७ हजार ७३१, चंद्रपूर ९ हजार ३२६, गडचिरोली ३ हजार ६१०, वर्धा १० हजार ३१९ आणि गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ५ हजार ४२३ असे एकूण ९७ हजार ९४३ नोंदणी अर्ज प्राप्त झाले, असे विभागीय उपायुक्त (सामान्य प्रशासन) एस.जी. गौतम यांनी सांगितले.