तत्कालीन मुख्याधिकारी व विद्यमान प्रभारी उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी मे. गुरुकृपा असोसिएट्स प्रा. लि. ची ७५ लाखाची बॅंक गॅरंटी व्यक्तिगत स्वार्थापोटी नियमबाह्य़रीत्या परत केल्याने महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब चौकशीतून पुढे आली आहे. दरम्यान, देवतळे यांच्यावर ठपका ठेवून हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, तसेच संचालक, नगर परिषद प्रशासन, संचालनालयाकडे सोपविण्याचा निर्णय चौकशी समितीने घेतल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, देवतळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले असून प्रतिबंधक विभागाकडे तक्रार झाल्याने गंभीर बनले आहे.
शहराला पाणी पुरवठा करण्याचे काम मे. गुरूकृपा असोसिएट्स प्रा.लि. या खासगी कंपनीला देण्यात आले होते. हे काम देतांना कंपनीकडून ७५ लाखाची बॅंक गॅरंटी पालिकेने घेतली होती, परंतु तत्कालीन मुख्याधिकारी रवींद्र देवतळे यांनी मनपा आयुक्त, महापौर व स्थायी समितीला विश्वासात न घेताच कंपनीला बॅंक गॅरंटी परत केली. या आर्थिक मुद्यावर स्थायी समितीच्या बैठकीत बराच गदारोळ झाला. देवतळे यांच्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत महापौर संगीता अमृतकर, आयुक्त प्रकाश बोखड, नगरसेवक संजय वैद्य, बलराम डोडाणी व नंदू नागरकर, अशी पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत केली. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या असून देवतळे यांच्यामुळे मनपाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. नगर पालिकेने या कंपनीसोबत करार केला तेव्हा शहरात २० हजार नळ कनेक्शन होते, तसेच पाणी कराची १ कोटी ३८ लाख ५८० रुपये जुनी वसुली येणे बाकी होती. जेवढी वसुली झाली त्यातून दहा टक्के रक्कम या कंपनीला देण्यात येणार होती. हा संपूर्ण करार करतांना नगर पालिकेने कंपनीकडून ७५ लाखाची बॅंक गॅरंटी घेतली होती. सलग सात वष्रे काम केल्यानंतर मे. गुरुकृपा असोसिएट्सने काम बंद केले.
या काळात कंपनीने ग्राहकांना नवीन कनेक्शन जुनी थकबाकी वसूल करून लाखो रुपये गोळा केले. ही रक्कम पालिकेकडे जमाच केली नाही. ही सर्व कामे तत्कालीन मुख्याधिकारी व विद्यमान प्रभारी उपायुक्त रवींद्र देवतळे यांच्या कार्यकाळात झाली. गुरुकृपाने काम सोडल्यानंतर ७५ लाखाची बॅंक गॅरंटी परत मिळावी, यासाठी देवतळे यांच्याकडे तगादा लावला. त्यावर देवतळे यांनी १७ ऑक्टोबर २०११ रोजी फाईलवर अभिप्राय नोंदवितांना जुनी थकबाकीची रक्कम वसूल केल्यावरच बॅंक गॅरंटी मोकळी करावी, असे पत्र कंपनीला दिले. मात्र, त्याच दिवशी देवतळे यांनी अकोला अर्बन बॅंकेचे धनादेश देऊन बॅंक गॅरंटी कंपनीला परतही केली.
विशेष म्हणजे, हा सर्व व्यवहार एकाच दिवशी झालेला आहे. पत्र व धनादेश देण्याचा व्यवहार एकाच दिवशी कसा झाला, असा प्रश्नही चौकशी समितीने उपस्थित केला, परंतु याचे उत्तर देवतळे यांच्याकडे नाही. गुरुकृपाने जुनी थकबाकी किती वसूल केली, याची माहिती घेण्यासाठी नगर पालिकेने सलग पाच वष्रे कंपनीशी पत्रव्यवहार केला, परंतु कंपनीने साधे उत्तरही दिले नाही. ही बॅंक गॅरंटी परत करतांना देवतळे यांनी व्यक्तीगत स्वारस्य दाखविल्याचेही समितीने या अहवालात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, कंत्राटदाराचा करार संपुष्टात आल्यानंतर सहा महिन्याने बॅंक गॅरंटी रिलिज करायची आहे, परंतु देवतळे यांनी करार संपुष्टात येण्याच्या केवळ १५ ते १७ दिवसात बॅंक गॅरंटी परत करून करारनाम्याच्या अटीचे उल्लंघन केले आहे, तसेच पाणी पुरवठा विभागाच्या सक्षम विभाग प्रमुखाचा देणे-घेणे नसल्याचा अहवाल अथवा अभिप्राय न मागविता देवतळे यांनी व्यक्तीगत स्तरावर बॅंक गॅरंटी मोकळी केल्याने पालिकेला मोठा आर्थिक भरुदड बसला आहे. या संपूर्ण चौकशीत देवतळे दोषी दिसून आले आहेत. त्यामुळे अहवाल सादर केल्यानंतर २० सप्टेंबरला महापौर संगीता अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच कक्षात समितीची बैठक झाली. या बैठकीला महापौर, आयुक्त प्रकाख बोखड, समिती सदस्य नगरसेवक संजय वैद्य, बलराम डोडाणी, नंदू नागरकर यांच्यासह देवतळे स्वत: हजर होते.
यावेळी समिती सदस्यांनी देवतळे यांची यासंदर्भातील बाजू व ठोस पुरावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, देवतळे समितीसमोर ठोस पुरावा व बाजू मांडण्यात असमर्थ ठरले. त्यामुळे या प्रकरणी देवतळे यांना दोषी धरून हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व नगर परिषद प्रशासन, संचालनालय, मुंबईकडे सोपविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
उद्या मनपाची आमसभा असून त्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे व अहवाल प्रतिबंधक विभागाकडे सोपविला जाणार असल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. आर्थिक भरुदडाचे प्रकरण प्रतिबंधक विभागाकडे गेल्याने देवतळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2013 रोजी प्रकाशित
वादग्रस्त रवींद्र देवतळे चौकशीत दोषी, मनपा वर्तुळात खळबळ
तत्कालीन मुख्याधिकारी व विद्यमान प्रभारी उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी मे. गुरुकृपा असोसिएट्स प्रा. लि. ची ७५ लाखाची बॅंक गॅरंटी व्यक्तिगत स्वार्थापोटी नियमबाह्य़रीत्या परत केल्याने महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब चौकशीतून पुढे आली आहे.

First published on: 26-09-2013 at 08:10 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guilty in r devatale controversial inquiry infront of municipal