उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्य़ांचा आलेख चढतीवर असून पोलिसांची झोप मात्र पार उडाली आहे. चार दिवसांपूर्वी सेंट्रल अ‍ॅव्हन्यूवरील अग्रसेन चौक परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराने या सर्वावर कडी केली. यातील पाच गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडले आहे. परंतु, या निमित्ताने नागपुरात देशी कट्टे, पिस्तुले नेमकी येतात कुठून?, या प्रश्नाचे उत्तर शोधले जात आहे. शहरातील ‘अंडरवल्र्ड’ सक्रिय झाल्याने पोलीस यंत्रणा चक्रावली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मात्र, नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी होणे गरजेचे असून प्राणघातक शस्त्रे शहरात आणणाऱ्या टोळ्यांवर अंकुश लावणे गरजेचे  आहे.
शेजारच्या मध्य प्रदेशातून शस्त्रांची आयात केली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. यात देशी कट्टय़ाला सर्वाधिक मागणी आहे. गेल्या काही महिन्यात शहरातील गुन्हेगारीच्या घटना पाहता देशी कट्टय़ांचा वापर वाढल्याचे दिसून येते. कुख्यात गुन्हेगारांबरोबर आता चिल्लर गुन्हेगारही सरळ देशी कट्टे वापरू लागले आहेत. सहज उपलब्ध होणारे शस्त्र असल्याने प्रतिस्पध्र्याचा काटा काढण्यासाठी किंवा लोकांना धमकावण्यासाठी देशी कट्टय़ाचा सर्रास वापर केला जात आहे. गेल्या काही महिन्यात शहरात झालेले काही खून गोळीबार करून झालेले आहेत. शहरातील सामाजिक स्वास्थ्याला धक्का लावणाऱ्या या घटनांनी पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे. ही शस्त्रे एकगठ्ठय़ाने नेमकी कुठून आयात केली जातात, याविषयी शोध सुरू असला तरी नेमके सूत्रधार अद्याप हाती लागलेले नाहीत. सह पोलीस आयुक्त संजय सक्सेना यांनी देशी कट्टय़ाचा वापर वाढल्याचे मान्य केले. नागपूर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण आणि शहरी भागात याचा वापर केला जात असून देशातील काही विशिष्ट शहरांमधूनच याची आयात केली जाते, असे सक्सेना यांनी सांगितले. मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशातील काही शहरे अवैध अग्निशस्त्र निर्मितीसाठी कुख्यात आहेत. याच शहरांमधून नागपुरातील गुन्हेगारांना अग्निशस्त्रांचा पुरवठा केला जातो. शेजारी असलेल्या मध्य प्रदेशात याचे प्रमाण अधिक आहे.