बुलढाणा जिल्ह्य़ात गेल्या आठ दिवसांपासून गारपीट व वादळी पावसाचे थमान सुरूच आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहर व परिसरात तसेच चिखली तालुक्यातील काही गावांमध्ये काल रात्री दहा नंतर विजेच्या कडकडाटासह वादळीपाऊस व तुफोनी गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत शेकडो हेक्टर शेत जमिनीवरील गहू, हरभरा व अन्य रब्बी पिके उदध्वस्त झाली.
बुलढाणा शहर व लगतच्या भागात रात्री दहा नंतर सुमारे तासभर वादळी पावसाचे थमान सुरू होते. चिखली तालुक्यातील डोंगरशेवली, धेडप,चांधई,शेलसूर, किन्होळा, केळवद, शिरपूर या गावांतही वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याचे वृत्त आहे.
जिल्ह्य़ात आतापर्यंत दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान झाले आहे. सुमारे १२५ कोटींचे नुकसान झाल्यानंतरही वादळी पाऊस व तुफोनी गारपीट थांबायला तयार नाही. मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी गारपीटग्रस्त भागांचा दौरा केला. नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महसूल यंत्रणा खूपच विलंब लावत आहे. त्यामुळे तातडीच्या मदतीलाही उशीर होत आहे. काल गारपीट झालेल्या गावातील शेत जमिनीचे सर्वेक्षण करण्याची तसदी चिखलीच्या महसूल यंत्रणांनी घेतली नाही. तहसिलदारांच्या आदेशाशिवाय नुकसानीचे सर्वेक्षण करणार नाही. अशी अडेल भूमिका  पटवाऱ्यांनी घेतल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. संबंधित पटवाऱ्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी डोंगरशेवली येथील  नागरिकांनी केली आहे.