राज्यातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन
आजच्या बैठकीत शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिल्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षांवरील असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.
बालभवनात शिक्षणमंत्री दर्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीअंती मुख्याध्यापक संघटनेने असहकार आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. बैठकीत संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब आवारी, वसंत पाटील, यूनूस पटेल, मधुकर झळके, सतीश जगताप व अन्य नेते सहभागी झाले होते.
मुख्याध्यापकांबाबत वेतनश्रेणी देण्यात अन्याय झाल्याची भावना संघटनेने व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीत केंद्र शासनाने मुख्याध्यापकांना दिलेल्या सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी राज्यातही देण्याचे यावेळी
मान्य करण्यात आले. आगामी तीन महिन्यात याविषयीचा निर्णय घेण्यात येईल. असे दर्डा यांनी स्पष्ट केले. या आश्वासनावर संतुष्ट होत बारावी व दहावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका न स्वीकारण्यांची भूमिका मागे घेण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी लोकसत्तास दिली. राज्यातील शाळा मुख्याध्यापकांना केंद्रीय विद्यालयाच्या उच्च प्राथमिक शाळेतील ‘क’ संवर्गातील मुख्याध्यापकाप्रमाणे वेतनश्रेणी मिळाली आहे. मात्र आजच्या बैठकीतील आश्वासन अंमलात आल्यास ९३००-३४८०० ऐवजी १५६००-३९१०० रूपये अशी घसघशीत वाढ मिळेल.