गरीब रुग्णांच्या आरोग्य सेवा कार्डमध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा समोर येताच मेयो रुग्णालया प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती. या घोटाळ्याची दखल घेत अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी तात्काळ बाह्य़ रुग्ण विभागात कार्ड काढणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना हटवून चौकशीसाठी समिती नियुक्ती केली होती. मात्र, त्या समितीने काय केले, त्यात कोणी दोषी आढळले का, हे अद्यापही समोर आले नाही.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमधील बाह्य़ रुग्ण विभागात जुलै महिन्यात लाखो रुपयाचा आरोग्य कार्डचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी तीन कर्मचाऱ्यांना हटवून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली होती. गेल्या वर्षभरात मेयो रुग्णालयात लाखो रुग्णांचे नवीन कार्ड काढण्यात आले मात्र, त्यापैकी १७ हजार कार्ड गायब करण्यात आले होते. प्रति रुग्ण १० रुपये प्रमाणे १७ हजार रुग्णांचे १ लाख ७० हजार रुपये होतात.
बाह्य़ रुग्ण विभागातील पाच कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचे निदर्शनास येतात तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेश गोसावी यांनी पाचही कर्मचाऱ्यांवर नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर काहीच कारवाई झाली नाही. या घोटाळ्याबाबत विविध संघटनांकडून चौकशीची मागणी करण्यात आल्यानंतर  डॉ. वाकोडे यांनी या विभागातील तीन कर्मचाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी ४ नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.
मात्र झालेल्या घोटाळ्याची चौकशीचे काय झाले याबाबत मौन पाळले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन खामगावकर यांनी सांगितले, चौकशीचा अहवाल आपल्याकडे नसून तो अधिष्ठातांकडे आहे त्यामुळे बाह्य़ रुग्ण विभागातील घोटाळ्याबाबत तेच बोलू शकतील. यानंतर अधिष्ठाता प्रकाश वाकोडे यांच्या संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण, होऊ शकला नाही.