नाशिकचे जिल्हा शासकीय रुग्णालय व्हेंटीलेटरवर असल्याचे ‘लोकसत्ता – नाशिक वृत्तान्त’ने उघड केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या आरोग्य विभागाने गुरूवारी हातपाय मारण्यास सुरूवात केली. रुग्णालयाच्या आवारात आमदार निधीतून उभारलेला परंतु, कित्येक दिवसांपासून बंद असणारा घाईघाईने उघडलेला प्रतीक्षा कक्ष, हे त्याचेच उदाहरण. रुग्ण व नातेवाईकांना उपयुक्त ठरू शकणारा प्रतीक्षा कक्ष खुला करताना त्याच्या साफ-सफाईचे औदार्य न दाखविल्याने तो ‘शोभेची बाहुली’ ठरणार असल्याचे दिसत आहे.
रुग्णालयाच्या एकूण कारभाराविषयी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये असणारी अस्वस्थता पुढे आल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. आ. वसंत गीते यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत गतवर्षी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात बाह्य़ रुग्ण विभागासमोरील जागेत प्रशस्त अशा प्रतीक्षा कक्षाची उभारणी केली. महापौर अॅड. यतिन वाघ तसेच आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. बी. डी. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे वाजतगाजत उद्घाटनही झाले. मात्र या सोहळ्यानंतर अपवादात्मक स्थिती वगळता हा कक्ष सातत्याने कुलपबंद राहिला. शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांच्या सुविधेसाठी केली गेलेली कक्षाची व्यवस्था केवळ शोभेची वास्तू ठरली. जिल्हा आरोग्य देखरेख व नियोजन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली. कक्षाचा वापर बाह्य रुग्ण विभागात येणारे रुग्ण तसेच गरोदर माता तसेच रात्रीच्यावेळी बाहेर गावाहुन येणाऱ्या रुग्ण तसेच नातेवाईकांसाठी व्हावा, अशी मागणी समिती सदस्यांनी केली.
त्यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र शिंगे यांनी प्रतीक्षा कक्ष बाह्य़ रुग्ण विभागात गर्दी वाढली की, रुग्णांना बसण्यासाठी सकाळी ८ ते १२ तसेच दुपारी ४ ते सायंकाळी या वेळेत खुला करून दिला जात असल्याचे सांगितले. मात्र, रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी सुरक्षिततेच्यादृष्टीने त्याच्या वापराबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे हा कक्ष इतरवेळी बंद ठेवला जातो. रात्री-अपरात्री या ठिकाणी काही आक्षेपार्ह घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतीक्षा कक्ष बंद आहे. नजीकच्या काळात कक्षात महिला तसेच पुरूष असे दोन विभाग करण्याचा विचार असल्याचे शिंगे यांनी सांगितले.
वास्तविक कक्षाचा आवाका लक्षात घेतला तर या ठिकाणी ५० ते ६० जण एकाचवेळी थांबू शकतात. जेणेकरून ऊन, थंडी , पाऊस यापासून त्यांचा बचाव होऊ शकतो. प्रतीक्षा कक्ष पूर्ण मोकळा असल्याने तेथे वृध्द वा गरोदर मातांसाठी बाकांची सोय नाही. तसेच शौचालयाची व्यवस्था नाही. अपुऱ्या सोयी सुविधांमुळे प्रतीक्षा कक्ष रुग्णांच्या कितपत उपयोगी ठरू शकेल, हा एक प्रश्न आहे. रुग्णालयातील अंतरंग उलगडल्यानंतर आरोग्य विभागाने त्याचे टाळे काठून तो खुला केला. पण, त्यात जमिनीवर बसता येणार नाही इतकी धूळ साचलेली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्ण व नातेवाईकांसाठी महत्वपूर्ण असणारा हा कक्ष उपलब्ध करण्यात रुग्णालयाने नेहमीचा कित्ता गिरविल्याचे दिसत आहे.