भारनियमन व कमी दाबाचा वीज पुरवठा या प्रश्नांसोबतच जलस्रोतही आटल्याने मेळघाटातील ९० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून अनेक गावांमध्ये लोकांना नदी-नाल्यांच्या पात्रात झरे काढून पाणी गोळा करावे लागत आहेत. प्रशासनाने मात्र मेळघाटात केवळ ११ टँकर्सची व्यवस्था केली आहे. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी सर्वाधिक असली, तरी पुरेशा प्रमाणात पाणी अडवले जात नसल्याने सातत्याने या भागात पाणी टंचाई जाणवत आली आहे. यंदाही अनेक गावांमध्ये लोकांना पाण्यासाठी १ ते ३ किलोमीटपर्यंत पायपीट करावी लागत आहे.
मेळघाटात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नळ योजना सुरू करण्यात आल्या. पण, नियोजनाअभावी लगेच त्या बंदही पडल्या. सध्या मेळघाटात विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. भारनियमनासोबत कमी दाबाचा वीज पुरवठा ही मोठी समस्या आहे. विजेअभावी पंप चालवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जलस्रोतांपासून टाक्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. कमी दाबाच्या वीज पुरवठय़ासाठी दूरवरून जंगलातून येणाऱ्या वीज वाहिन्यांमधून होणारी गळती कारणीभूत मानली जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले न गेल्याने अंधारासोबतच जलसंकटालाही आदिवासींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना, भारत निर्माण यासारख्या योजनांमधून अनेक गावांमध्ये नळ योजना सुरू करण्यात आल्या खऱ्या, पण जलस्रोतांचा अभ्यास न करता आधी जलवाहिन्या टाकून नंतर जलस्रोत शोधण्याचा उफराटा प्रकार दिसून आला. कंत्राटदारांच्या लाभासाठी यंत्रणा राबत गेली, पण अनेक योजना वर्षभरातच बंद पडल्या. ज्या ठिकाणी जलस्रोत आटले, त्या ठिकाणच्या योजना ठप्प झाल्या आहेत.
सध्या मेळघाटातील खाऱ्या, टेंभ्रू, कुसुमकोट, मांडवा, जुटपाणी, टिंगऱ्या, राणीगाव, कळमखार, गोंडवाडी, बासपाणी, दुनी, बोड, कडाव, हरिसाल, चौराकुंड, चटवाबोड, सावऱ्या, ढाकणा, बोरीखेडा, गडगाभांडूम, राणीपिसा, बिबामल इत्यादी गावांमध्ये तीव्र जलसंकट आहे. जिल्हा प्रशासनाने मेळघाटात ११ टँकर्सद्वारे पाणी पुरवण्यास सुरुवात केली आहे. पण, ही व्यवस्था अपुरी आहे. १४ विहिरींचे अधिग्रहण आणि नळ दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण, वीज पुरवठाच नसल्याने यंत्रणाही हतबल आहे. अनेक गावांमध्ये नदी-नाल्यांच्या पात्रांमध्ये झरे खोदून पाणी गोळा करावे लागत आहे. विहिरी आटल्या आहेत. गावात टँकर आला की, मोठी झुंबड उडते. कामावर जावे की टँकरची वाट पहावी, अशा कात्रीत आदिवासी गावकरी अडकले आहेत. यात जास्त होरपळ महिला आणि लहान मुलांची आहे. डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिला आणि लहान मुले हे सार्वत्रिक चित्र आहे. अनेक गावांमध्ये हातपंप नावालाच उरले आहेत. नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात न आल्याने पाण्याचा शोध घेत दूरवर जाण्याशिवाय गावकऱ्यांना पर्याय उरलेला नाही. मेळघाटातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आजवर अनेक उपाययोजना व त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आला आहे. पण, यातून काय साध्य झाले, हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासले गेले पाहिजे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.