* कसारा घाटात दरड कोसळून रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत
* भिंत कोसळून एक ठार, सहा जखमी
* दारणा धरणातून २४,५९२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
* गंगापूर धरणाचे दरवाजेही उघडणार
* गोदावरी व दारणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

एकाच दिवसात जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद.. त्यामुळे प्रथमच दुथडी भरून वाहणारे नदी-नाले.. जलमय झालेले रस्ते.. पाण्याने ओतप्रोत भरलेली शेतजमीन.. कसारा घाटात दरडी कोसळल्याने ठप्प झालेली रस्ता व रेल्वे वाहतूक.. त्यामुळे ठिकठिकाणी अडकलेले हजारो प्रवासी.. पूल पाण्याखाली गेल्यामुळे संपर्कहीन झालेली अनेक गावे.. शहरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू व सहा जखमी.. काझी गढी भागात माती खचण्याचा धोका लक्षात घेऊन स्थानिकांचे करण्यात आलेले स्थलांतर.. नदीकाठच्या गावांना देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा. धरणांमध्ये वेगाने वाढणारा जलसाठा.. कोलमडलेले जनजीवन.. वातावरणात निर्माण झालेला कमालीचा गारवा..
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या पावसाने नाशिकला चांगलेच झोडपले असून, आठ दिवसांपूर्वी असणारे टंचाईचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ८६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी दारणा धरणाचा विसर्ग २४,५९२ क्युसेक्सवर गेल्यामुळे दारणा नदीने धोकादायक पातळी गाठली आहे. दुसरीकडे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वच नद्या-नाल्यांना पूर आला. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले असून लवकरच या धरणातून पाणी सोडले जाईल. शहरातील पाथर्डी फाटा परिसरात संरक्षक भिंत कोसळून सहा जण जखमी झाले तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले. मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात बुधवारी ठिकठिकाणी दरड कोसळून घाटातील दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. तर घाटातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर बोगद्याच्या बाहेरील बाजूकडील रुळांवर दरड कोसळली. यामुळे रेल्वे वाहतूक बंद झाली. पोलीस यंत्रणा व स्थानिक प्रशासनाने तातडीने धाव घेऊन मातीचा भराव बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू केले, परंतु घाटात दिवसभर पाऊस असल्याने या कामात व्यत्यय येत होता. दुपारी चारच्या सुमारास घाटातील नव्या रस्त्यावरील मातीचा भराव बाजूला करण्यास यश मिळाले. त्यानंतर या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. घाटातील जुन्या रस्त्यांवरील भराव हटविण्याचे काम सुरू होते. त्या मार्गावरून दुपारनंतर लहान गाडय़ा सोडण्यात आल्या. पावणे दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या पावसाने कसर भरून काढण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. पाच ते सहा दिवस रिमझिमस्वरूपात कोसळणाऱ्या पावसाने तीन दिवसात चांगलाच जोर पकडला. मागील चोवीस तासांत हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील बहुतांश भाग त्याने व्यापल्यामुळे पाणीटंचाईचे सावट दूर सारले जाणार आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू होती. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले. सिडकोतील उत्तमनगर व दौलतनगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. ज्या रस्त्यांवर रस्ता दुभाजक टाकलेले आहेत, तिथे एका बाजूला पाणीच पाणी साचून तळे तयार झाले. या मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. या स्थितीमुळे काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूने दुहेरी वाहतूक करण्यात आली. शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले. मायको सर्कल-गोविंदनगर रस्त्यावरील नासर्डी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.
ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पावसाचा सर्वाधिक जोर आहे. नदी व नाले दुथडी भरून वाहत असल्याने आणि काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दारणा धरणातून नगर व औरंगाबादसाठी पाणी सोडण्यात आले आहे. धरणांच्या जलसाठय़ात समाधानकारक वाढ होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

नाशिकवरील पाणीटंचाईचे संकट दूर
गंगापूर व दारणा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने नाशिक शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर होण्याच्या मार्गावर आहे. शहराच्या पाणीपुरवठय़ाची मुख्य भिस्त गंगापूर धरणावर आहे. त्र्यंबकेश्वर तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने गंगापूरमध्ये ७० टक्के जलसाठा झाला. पावसाचा जोर कायम राहिल्यास या धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. नाशिकरोड भागात दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्या धरणात सध्या ५५३१ (७८ टक्के) जलसाठा झाला आहे. या धरणातून २४,५९२ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. दोन्ही धरणांमध्ये मुबलक जलसाठा झाल्यामुळे शहरात लागू असणारी पाणी कपात लवकरच मागे घेतली जाण्याची चिन्हे आहेत.

एकाच दिवसात
८६२ मिलीमीटर पाऊस
मागील चोवीस तासांत जिल्ह्यात विक्रमी म्हणजे ८६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक म्हणजे २२३ मिलीमीटर पाऊस इगतपुरी तालुक्यात, तर सर्वात कमी नांदगाव (१) तालुक्यात झाला. एकाच दिवसात इतक्या पावसाची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाशिक व पेठ तालुका (प्रत्येकी ७०), दिंडोरी (४३), त्र्यंबकेश्वर (१२५), चांदवड (३०), कळवण (७६), बागलाण (४३), सुरगाणा (७१), देवळा (३४), निफाड (३१), सिन्नर (२३) अशा पावसाची नोंद झाली आहे. बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असला तरी मालेगाव (६), नांदगाव (१), येवला तालुक्यात (३) इतक्या कमी पावसाची नोंद झाली.
धरण क्षेत्रात संततधार
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने चांगलाच वेग पकडल्याने कोरडय़ा पडलेल्या धरणांमध्ये वेगाने जलसाठा होऊ लागला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची नोंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाची स्वत:ची यंत्रणा आहे. मागील चोवीस तासात दारणा धरण परिसरात ७१ मिलीमीटर, घोटी २१९, त्र्यंबकेश्वर १२८, गंगापूर धरण क्षेत्रात १२५, पालखेड ३१, करंजवण ६१, ओझरखेड ५६, वाघाड ९०, कडवा ८५, मुकणे १०५, पालखेड ३१, कश्यपी ९६, पुणेगाव ६६, इगतपुरी २३४, गौतमी-गोदावरी ११०, मुकणे २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातील पावसामुळे पाण्याची पातळी उंचावत आहे. मुसळधार पावसामुळे दारणा धरणातील विसर्ग २५ हजार क्युसेक्सवर नेण्यात आला. या दारणा धरणात ५५३१ दशलक्ष घनफूट (७८ टक्के) जलसाठा झाला आहे. गंगापूर धरणात ३३२२ (५९), नांदुरमध्यमेश्वर २१० (८१), पालखेड ३२५ (४३.३८), करंजवण १३५० (२५.१३), ओझरखेड १८३ (८.५७), वाघाड ७३० (२९.१५), कडवा ६७८ (४०.१७), मुकणे १२३४ (१७), आळंदी २४६ (२४.७४), कश्यपी २६७ (१४.४१), पुणेगाव २८१ (२९.२५), वालदेवी ४०५ (३५.७१), गौतमी-गोदावरी ३७७ (२०.१८), भावली १२४२ (८६) असा जलसाठा झाला असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

संरक्षक भिंत कोसळून एक ठार, सहा जखमी
संततधार पावसामुळे वेगवेगळ्या अपघातांना निमंत्रण दिले असून नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात हरिविश्व इमारतीच्या मागील बाजूस संरक्षक भिंत झोपडय़ांवर कोसळून एक ठार तर सहा जण जखमी झाले. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन ढिगाऱ्यात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. पाथर्डी परिसरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, परंतु तत्पूर्वीच एकाचा मृत्यू झाला होता. ऊर्वरित सहा मजूर जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. जखमींमध्ये राम भजन, राकेश गौर, शिवभजन, छोटू, धर्मराज शर्मा व
मनोरथ यांचा समावेश आहे. इमारतीच्या मागील बाजूस गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. संरक्षक भिंतीलगत मजुरांनी झोपडय़ा उभारल्या आहेत. रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसात संरक्षक भिंत ढासळली. काझी गढी भागात पावसामुळे काही जुन्या घरांची स्थिती धोकादायक झाली आहे. त्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाने धाव घेऊन स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली. पावसामुळे शहर परिसरात ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली. वकील वाडी येथे झाड कोसळले. सुदैवाने
त्यात कोणी जखमी झाले नाही. दिवसभरात वेगवेगळ्या भागात या घटना सुरू असल्याने अग्निशमन विभागाची एकच धावपळ
उडाली.

हजारो प्रवाशांचे हाल
मनमाड-मुंबई लोहमार्गावर कसारा घाटात बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दरड कोसळून अप मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटली. परिणामी, मध्य रेल्वेची मनमाड-मुंबई वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद झाली. यामुळे मनमाड, नाशिकरोड, लहवीत, इगतपुरी या ठिकाणी लांबपल्ल्याच्या गाडय़ांना थांबविण्यात आले, तर काही गाडय़ांचे मार्ग खंडित करून त्या माघारी वळविण्यात आल्या. भुसावळ-मुंबई पॅसेंजर गाडी मनमाड रेल्वे स्थानकातून पुन्हा भुसावळकडे माघारी पाठविण्यात आली, तर इतर लांबपल्ल्याच्या गाडय़ा मनमाड रेल्वे स्थानकावर खोळंबून होत्या. त्यामुळे नाशिक, कल्याण व मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. मनमाड व नाशिकरोड रेल्वे स्थानकात हजारो प्रवासी अडकले. इगतपुरी-कसारा लोहमार्गावर दरड कोसळल्याने अप मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली. मनमाडहून मुंबईकडे निघालेल्या गाडय़ांना इगतपुरी स्थानकात थांबविण्यात आले. एलटीटी कुर्ला एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकात, सेवाग्राम इगतपुरी तर जनशताब्दी एक्स्प्रेस देवळाली कॅम्प स्थानकात थांबविण्यात आली. या रेल्वेगाडय़ा तिथून माघारी पाठविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन मनमाड रेल्वे स्थानकातून काही गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले. दुपारी बारा वाजता मनमाड स्थानकात आलेली भुसावळ-मुंबई पॅसेंजर मार्ग खंडित करून माघारी फिरविण्यात आली. वाराणसी-मुंबई, पटणा-मुंबई तसेच गोरखपूर या तीन रेल्वेगाडय़ा मनमाड-दौंड-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या. रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने खास जादा बसेसची व्यवस्था केली. बुधवारी इगतपुरी-कसारा या मार्गावर पाच जादा बस सोडण्यात आल्या. तसेच लासलगाव व मनमाड बस स्थानकावरून प्रत्येकी तीन जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.