डोंबिवली पश्चिमेत भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्यावर आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी विविध प्रकारचे पदभार देऊन ठेवले आहेत. ते निम्मा वेळ दौऱ्यामध्ये असतात. पाणीपुरवठा विभागावर त्यांचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याने डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, अशी टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या महासभेत केली.पाणीटंचाईवर बेंबीच्या देठापासून, आपली ‘मतपेटी’ राखण्यासाठी कळवळून बोलणारे डोंबिवली पश्चिमेतील नगरसेवक आपल्या अवतीभवती सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामे, चोरीच्या नळजोडण्यांच्या विषयावर मात्र सोयीस्कर मौन बाळगून बसले होते. नगरसेवक जितेंद्र भोईर, दीपेश म्हात्रे या नगरसेवकांनी पाणीटंचाईच्या विषयावर सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली होती. अनधिकृत नळजोडण्यांच्या विषयावर सतत टाहो फोडणारे नगरसेवक वामन म्हात्रे गैरहजर होते. डोंबिवली पश्चिमेत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. टँकर लॉबीने या भागावर पकड बसविली असून गैरमार्गाने टँकरमधील पाणी विकून टँकर लॉबी आपले उखळ पांढरे करून घेत आहे. पालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा पश्चिम भागात होत नाही. पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना जल वाहिन्यांविषयी ज्ञान नसल्याने गोंधळात आणखी भर पडली आहे. उपलब्ध पाणी अन्य भागात वळते करण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी आयुक्तांचे ‘लाडके’ असल्याने ते कोणाही नगरसेवकाचे काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. फक्त ९० मिनिटांची कॅसेट ऐकून समोरच्या नगरसेवकाला ते गोड बोलून गारद करतात अशी टीका नगरसेवक विश्वनाथ राणे, जितेंद्र भोईर यांनी केली. दीपेश म्हात्रे, राणे, भोईर यांनी एका शब्दाने आपल्या अवतीभवती सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विषयाला ‘स्पर्श’ केला नाही. अनधिकृत बांधकामांच्या विषयावर नेहमीच पोटतिडकीने बोलणाऱ्या वैशाली दरेकर पाणी आणि राजकारण विषयात अडकून पडल्या होत्या. विरोधी पक्षनेते मंदार हळबे, सभागृह नेते रवी पाटील यांनी मात्र अनधिकृत बांधकामे, चोरीच्या नळजोडण्या हीपण पाणीटंचाईची कारणे आहेत. नगरसेवक, अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे हा विषय हाताळला पाहिजे. प्रशासनाने अनधिकृत नळजोडण्या शोधण्यासाठी एजन्सी नेमावी किंवा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही कामे करावीत. ह प्रभागात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे, नळजोडण्या आहेत. याविषयी प्रशासन गप्प बसून कसली वाट पाहत आहे, अशी टीका या दोघांनी केली. पाऊस पडेपर्यंत नवीन इमारतींना पाणी जोडणी देऊ नका अशी मागणी शिंदे यांनी केली. माधुरी काळे, मनोज घरत, कैलास शिंदे चर्चेत सहभागी झाले होते. आयुक्त सोनवणे यांनी पालिकेचे नवीन पाणी प्रकल्प येत्या दोन महिन्यांत पूर्ण होऊन शहरात मुबलक पाणीपुरवठा सुरू होईल असे ठोकळेबाज उत्तर देऊन नगरसेवकांना ‘पाणी’ पाजण्यात यश मिळविले. जे अधिकारी ‘झोकून’ काम करतात त्यांच्या पाठीमागे मी उभा राहतो. प्रमोद कुलकर्णी आपले लाडके नाहीत. ते तळमळीने काम करतात. सर्वाधिक जास्त मेमो मीच त्यांना दिले आहेत, असे सांगून कुलकर्णीची आयुक्तांनी पाठराखण केली. कल्याणमध्ये ‘गुरुबाबा’ आले की सर्वाधिक धावपळ करण्यात क प्रभागाचे गणराज आणि कुलकर्णी सर्वाधिक आघाडीवर असतात, ते पालिकेतील चर्चेतून समजते.