सामाजिक भान असलेल्या लोकप्रतिनिधीकडून कोणी आवाहन करण्याआधीच कार्याची अपेक्षा असते. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर तर त्याची गरज अधिकच आहे. दुष्काळग्रस्त भागास मदत करताना काही सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात गाजावाजा केला जात असल्याची स्थिती असताना नगरसेवक हेमंत गोडसे यांनी त्यांचे वर्षभराचे ८४ हजार रुपयांचे मानधन दुष्काळी भागासाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. या मानधनातून सिन्नर तालुक्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोणी आवाहन करण्याआधीपासून त्यांनी हे मदतकार्य सुरू केले आहे.
यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य असतानाही गोडसे यांनी पाच वर्षांचे मानधन कुपोषित बालकांच्या मदतकार्यासाठी दिले होते.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर विविध संघटना, राजकीय पक्ष आणि सरकारी यंत्रणांकडून मदत जाहीर केली जात आहे. शहरातील प्रभाग ६१चे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी महापालिकेचे एक वर्षांचे मानधन दुष्काळी भागासाठी देण्याचे जाहीर केल्यानंतर त्वरित त्यासंदर्भातील कार्यास सुरुवात केली. सिन्नर तालुक्यातील पांगरी, निऱ्हाळे, गुळवंच, घोटेवाडी, मऱ्हळ, गणेशनगर, माळवाडी, हिरगांव, कुंदेवाडी, साचाळे, मलढोण, तिंपखाडी, फुलेनगर, डुबेरवाडी, घोटवाडी, बारागांव पिंपरी, उजनी, खंबाळे, सिन्नर, टाऊनशिप, विरगांव, शंकरनगर या गावांमध्ये टँकरही स्वखर्चाने सुरू करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील हरसुल गावातील देवडोंगरी, सादडपाडा, काकडपाडा, चिंचओहोळ व इतर गावांनाही लवकरच मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहितीही गोडसे यांच्या वतीने देण्यात आली. या कामासाठी महापालिकेचे मानधन निश्चितच कमी पडत असल्याने इतर रक्कम स्वत: देण्याचे त्यांचे नियोजन आहे.
दरम्यान, टँकरने पाणीपुरवठा करण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत असल्याने चारा पुरविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी त्यांना सिन्नरचे जयंत आव्हाड, कृष्णा कासार, दीपक सुडके आदींकडून सहकार्य मिळत आहे.