देवळा तालुक्यातील चिंचवे येथे लघु पाटबंधारा दुरूस्ती कामात मातीचा भराव कोसळून पाच अभियंत्यांना जीव गमवावा लागल्याची गंभीर दखल घेत शासनाने या प्रकरणाची अन्य विभागाच्या मुख्य अभियंत्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चाळीसगावच्या स्वाती कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराच्या कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. दुर्घटनेत मरण पावलेल्या पाच अभियंत्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रूपयांची मदत शासनाने जाहीर केली.
नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ, जलसंधारण मंत्री नितीन राऊत, याच विभागाचे राज्यमंत्री सुरेश धस यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देवळ्यातील चिंचवे येथे लघु पाटबंधारे विभागातंर्गत बांधलेल्या तलावातील जलवाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी बंधाऱ्यापासून सुमारे ५० फूट खोल चारी खोदण्यात आली होती. त्याची पाहणी करताना लघु पाटबंधारे विभागाचे (स्थानिक स्तर) उपअभियंता एच. एम. पाटील, एस. जी. सोनवणे, शाखा अभियंता पी. यु. सूर्यवंशी, ए. के. शेवाळे, व्ही. एच. आहेर यांच्यावर अचानक मातीचा ढिगारा कोसळला. त्याखाली दबून सर्वाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंत्र्यांनी संबंधितांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. शासकीय मदत देण्यासोबत कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे भुजबळ यांनी नमूद केले. लघु पाटबंधारेच्या दुरूस्ती कामात संबंधित ठेकेदाराला पुढील व मागील भाग वगळता अन्यत्र काम न करण्याची सूचना देण्यात आलेली होती. तरीही त्याने जलवाहिनी दुरूस्तीसाठी ५० फूट खोल चारी कशी खोदली, असा प्रश्न संबंधितांनी उपस्थित केला. ही दुर्घटना कशामुळे घडली, त्यात दोष कोणाचा, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. चौकशीची जबाबदारी अन्य विभागातील मुख्य अभियंत्यावर सोपविली जाणार असल्याचे भुजबळ व राऊत यांनी नमूद केले. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करताना कोणती कलमे लावायची, याबद्दल पोलीस यंत्रणा निर्णय घेईल, असेही सांगण्यात आले.
पावसाळ्यात प्रतिबंध करण्यात आला असतानाही बंधाऱ्याचे काम सुरू होते. त्यातही केवळ खडकावरील काम करण्यास संमती दिली गेली. त्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने ‘जॅकवेल’च्या भागात खोदकाम केले. या कामाची पाहणी करणाऱ्यांमध्ये सदोष कामामुळे निलंबित झालेल्या अधिकाऱ्याचाही समावेश होता. हे आश्चर्यकारक असल्याचे राऊत यांनी सांगितले. ही दुर्घटना म्हणजे सर्व शासकीय यंत्रणांनी बोध घेण्यासारखा प्रकार आहे. चुकीच्या पद्धतीने झालेले काम आणि त्यात पुन्हा चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली दुरूस्ती ही या घटनेने दाखवून दिली. जलसंधारण विभागाने भविष्यात अशा घटना घडू नयेत या दृष्टिने उपाय आधीच सुरू केले आहे. गुणवत्ता व नियंत्रण कक्षाची स्थापना करून प्रत्येक कामाची गुणवत्ता पडताळणी केली
जात आहे.

..तर दुर्घटना टळली असती
खडकाळ भाग वगळता बंधाऱ्याच्या प्रतिबंधीत क्षेत्रात काम केले नसते तर तसेच खोदकाम करताना योग्य पद्धतीचा वापर केला असता, मातीचा भराव कोसळल्यावर त्वरित मदतकार्य उपलब्ध झाले असते तर कदाचित ही भीषण दुर्घटना टळली असती, असे मत संबंधितांनी व्यक्त केले. कार्यकारी अभियंत्यांनी संबंधिताला पावसाळा सुरू असल्याने पुढील व मागील भाग सोडून इतर कोणत्याही भागात काम करू नये, असे सूचित केले होते. असे असताना ठेकेदाराने जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी ५० फूट चारी कशी खोदली, हा प्रश्न असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. चर खोदताना उभ्या पद्धतीने खोदकाम केले गेले. त्याऐवजी चर ‘व्ही’ आकाराने खोदली गेली असती तर भराव या पद्धतीने खाली कोसळला नसता, असे जलसंधारण मंत्री राऊत यांनी नमूद केले. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा मजूर जेवणासाठी गेले होते. अन्यथा ढिगाऱ्याखाली दबलेल्या अभियंत्यांना लगेच मदत मिळू शकली असती. परंतु, तसे घडले नाही आणि पाच अभियंत्यांना प्राण गमवावे लागले.

निकृष्ठ दर्जाच्या कामाचे बळी
ठेकेदाराने केलेले निकृष्ट दर्जाचे काम, विहित मुदतीत काम पूर्ण करण्यास दाखविलेली अनास्था, पावसाळ्यात जॅकवेल दुरूस्तीसाठी चुकीच्या पद्धतीने खोदलेला ५० फूट चर, लघुपाटबंधारे विभागाच्या सूचनांकडे केलेले दुर्लक्ष हे घटक देवळा तालुक्यातील चिंचवे येथील दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. साधारणत: १० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कामावर आतापर्यंत दोन कोटी ६४ लाखाचा निधी खर्च झाला आहे. परंतु, ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे करून अपूर्ण ठेवले. त्यामुळे त्यातील दोष दूर करून ते पूर्ण करावे, अशी सूचना कार्यकारी अभियंत्यांनी स्वाती कंस्ट्रक्शनला वारंवार पत्राद्वारे केली होती. काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने अपूर्ण काम पूर्ण करून दोष दूर करण्याची तयारी दर्शविली. पावसाळ्यात बंधाऱ्यांची कामे केली जात नसताना या विभागाने खडकाळ भागात ते काम करण्याच्या अटीवर त्यास संमती दिली. या विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने जलवाहिनी दुरूस्तीसाठी केलेले खोदकाम अभियंत्यांच्या जिवावर बेतले आहे.
निलंबित अधिकारी का गेले ?
बंधाऱ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा विषय विधीमंडळात स्थानिक आमदारांनी तारांकीत प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. तेव्हा कामाची चौकशी होऊन चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मरण पावलेले एस. जी. सोनवणे हे त्याच प्रकरणात निलंबित झालेले अधिकारी होय. निलंबित असतानाही हे अधिकारी या कामाची पाहण्यासाठी कसे गेले, याबद्दल जलसंधारण मंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले.