जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांच्या बदलीनंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्याकडे या पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. जि. प. च्या इतर प्रमुख विभागांतही आधीपासूनच प्रभारी कार्यरत आहेत. सिंघल यांच्या बदलीनंतर आता जि. प. त संपूर्णपणे प्रभारी राज चालू आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप यांची बदली झाली. वर्षभरापासून हे पद रिक्त आहे. सुरुवातीला एन. पी. धांडे यांनी काम सांभाळले. ते सेवानिवृत्त झाले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. गेल्या वर्षांपासून मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने येथे प्रभारीच कार्यरत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंत्याचे पद आठ महिन्यांपासून रिक्त आहे. उपअभियंता बंडकार प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. हिंगोली व वसमत येथील बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांची पदे रिक्त आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांची ३ पदे रिक्त आहेत. जिल्ह्य़ात राजपत्रित मुख्याध्यापकांच्या १९ जागा मंजूर आहेत. पैकी १४ राजपत्रित मुख्याध्यापकांच्या जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. शिक्षणाधिकारी उजगरे अपघातात जखमी झाल्याने अनेक महिन्यांपासून रजेवर आहेत. त्यांचा पदभार शिवाजी पवार यांच्याकडे आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांची ५ पदे मंजूर आहेत. पैकी ३ पदे रिक्त आहेत. सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांची ३ पदे रिक्त आहेत. लघुसिंचन पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता गब्रू राठोड ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. समाजकल्याण अधिकारी मकरंद संगीता हिंगोलीतून बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. श्वेता सिंघल ११ महिनेच या पदावर राहिल्या. त्यांच्या बदलीनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ते निकाली निघणार काय, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
————