रब्बी हंगामात सर्वत्र ज्वारीची पेरणी केली जाते. तुळजापूर तालुक्यातील कात्री येथील एका शेतकऱ्यानेही महाबीजकडून बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र ज्वारी नव्हे, तर शेतात हायब्रीडचे पीक वाढल्याचे दिसून येत आहे. महाबीजच्या चुकीची शिक्षा शेतकऱ्यास मिळाल्याचे या प्रकारावरून उघड होत आहे.
कात्री गावचे जांबुवंत कदम यांनी २२ ऑक्टोबरला तुळजापूर येथील पूजा अॅग्रो एजन्सीकडून महाबीज ज्वारीच्या दोन बॅगा ‘मोती’ हे वाण खरेदी केले. त्याचा लॉट नंबर २५०१ व १०२५ असा आहे. एका बॅगसाठी त्यांनी २४० रुपये मोजले. १ नोव्हेंबरला आपल्या दोन एकर क्षेत्रावर याची पेरणी केली. मात्र, हे पीक कोवळ्या अवस्थेत होते, त्यावेळी त्याचा नेमका अंदाज लागला नाही. परंतु पिकाची वाढ होत गेली, त्यावेळी मात्र हे पीक ज्वारी नसून हायब्रीड असल्याचे जाणवू लागले. अनेक शेतकऱ्यांनीही हे पीक हायब्रीडचे असल्याचे सांगितले.
त्यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी तुळजापूर पंचायत समितीकडे धाव घेतली. तेथील कृषी विभागाकडे संपर्क साधून २ डिसेंबरला या बाबत रितसर तक्रार केली. पं. स.चे कृषी विस्तार अधिकारी सतीश िपपरकर, अॅग्रो एजन्सीजचे धनंजय धुरगुडे व कदम यांच्या उपस्थितीत पिकाचा पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यात िपपरकर यांनी कदम यांच्या शेतातील हे पीक ज्वारीचे नसून हायब्रीडच असल्याचे सांगून शंभर टक्के भेसळ असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, कदम यांचे दोन एकरांमधील ज्वारीचे उत्पादन, कडबा व मशागत आदींचे सुमारे पाऊण लाख रुपयांचे नुकसान झाले. महाबीजच्या गलथान कारभाराचा फटका बसल्याने रब्बीचा हंगाम वाया गेला. त्यामुळे कदम यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
महाबीजकडून फसगत
रब्बी हंगामात सर्वत्र ज्वारीची पेरणी केली जाते. तुळजापूर तालुक्यातील कात्री येथील एका शेतकऱ्यानेही महाबीजकडून बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र ज्वारी नव्हे, तर शेतात हायब्रीडचे पीक वाढल्याचे दिसून येत आहे.
First published on: 14-02-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hoax by mahabeej