दहिसरमधील आय. सी. कॉलनीमधील पालिका दवाखाना आणि ग्रंथालयाचे आरक्षण असलेल्या जागेमध्ये सुरुवातीला दादा-दादी पार्क आणि आता डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आल्याचे उजेडात आले आहे. इतकेच नव्हे तर या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन दस्तुरखुद्द महापौरांच्या हस्ते करण्यात आले.
आय. सी. कॉलनीमधील बिलबेरी अपार्टमेन्टमधील जाग ग्रंथालय आणि पालिका दवाखान्यासाठी आरक्षित आहे. असे असताना मागील निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी तेथे दादा-दादी पार्क सुरू केले. त्यानंतर या जागेत ज्येष्ठ नागरिकांचे विविध उपक्रम होऊ लागले.
मात्र आता ज्येष्ठ नागरिकांना तेथून हुसकावून लावण्यात आले असून मानव सेवा संघाच्या मदतीने तेथे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन महापौर सुनील प्रभू यांनी अलीकडेच केल्याची माहिती काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
या प्रकरणाची चौकशी करावी आणि त्याची माहिती स्थायी समितीमध्ये सादर करावी, अशी मागणीही शीतल म्हात्रे यांनी यावेळी केली.
तसेच प्रसुतीगृहासाठी आरक्षित असलेल्या जागेत ‘मिठी लाइफ लाइन रुग्णालय’ सुरू असून रोटरी क्लब ऑफ दहिसरच्या मदतीने तेथे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेची परवानगीही घेतलेली नाही, असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. याबाबत चौकशी करून पुढील बैठकीत माहिती देण्यात येईल, असे सांगत अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी वेळ मारून नेली.