शहर रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या १५९ लाभार्थ्यांना महापालिकेतर्फे जागा देऊन घरकुल बांधून देण्याचा निर्णय ‘रमाई आवास घरकुल योजने’च्या बैठकीत घेण्यात आला. फुलेनगरमधील ७९, टाउन हॉल ते मकई गेट परिसरातील जयभीमनगर भागातील ८० कुटुंबीयांचा प्रश्न मार्गी लावण्याचे गुरुवारी ठरविण्यात आले. मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.
रमाई आवास घरकुल योजनेच्या बांधकामाचा आढावा डॉ. भापकर यांनी आज घेतला. या बैठकीस समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त जयश्री सोनकवडे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता एफ. डी. काकडे, नगररचनाकार डी. जी. सरपाते आदी उपस्थित होते. दारिद्रय़रेषेखालील १ हजार २६७ लाभार्थीना घरकुल मंजूर करण्यात आले. त्यातील २५५ घरकुलांची कामे सुरू आहेत. तर १०० घरकुलांची बांधकामे पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अर्धवट बांधकामे २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत व उर्वरित मंजूर घरकुलांची कामे फेब्रुवारी २०१३ पूर्वी पूर्ण केलीच जावी, असे निर्देश डॉ. भापकर यांनी दिले.
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत अत्याचारास बळी पडलेल्या पंडित पांडू जाधव, अलका गुलाब तायडे, पंडित भीमराव तुपे यांना महापालिकेतर्फे विशेष बाब म्हणून रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत लाभ दिला जाईल, असे या वेळी सांगण्यात आले.