मुंबई महानगरपालिकेने गाडय़ांच्या पार्किंगसाठी नवे धोरण ठरविताना गोराई, चारकोप, मालवणी, वसरेवा, घाटकोपर येथे सुमारे २५ वर्षांपूर्वी वसविलेल्या बैठय़ा वस्त्यांचा बिलकूलच विचार केलेला नसल्याने या भागातील पार्किंगचा प्रश्न ‘जैसे थे’च राहणार आहे.
गोराई-चारकोपमध्ये शेकडोंच्या संख्येने बैठय़ा घरांच्या वस्त्या आहेत. २५ ते ३० वर्षांपूर्वी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी म्हणून या वस्त्या वसविण्यात आल्या. त्यावेळी या कुटुबांकडेही चारचाकी वाहन भविष्यात येऊ शकेल, असा विचारही करण्यात आला नव्हता. या बैठय़ा घरांची व्यवस्था त्यावेळेस म्हाडाने आखीव-रेखीव अशी करून दिली होती. पण, या वस्त्यांमधून जाणारे रस्ते जेमतेम १० फूट रुंदीचे आहेत. नेमकी हीच बाब या वस्त्यांमधील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यात अडचणीची ठरली आहे.
या वस्त्यांमधील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती आता ‘सुखवस्तू’ म्हणावी इतपत सुधारली आहे. काहींकडे स्वत:चे दुचाकी वाहनही आले. पण केवळ पार्किंगची सोय नाही म्हणून कित्येक जण चारचाकी वाहनाचा विचारही करत नाहीत. सोसायटीच्या आवारात वाहन ठेवण्यासाठी जागा नाही. पालिकेच्या नव्या धोरणानुसार रस्त्यावर गाडी ठेवायची तर जागा नाही. कारण एका बाजूने जरी वाहने ठेवली तरी संपूर्ण रस्ता अडून जातो. त्यामुळे, नव्या धोरणामुळेही या रहिवाशांचा पार्किंगचा प्रश्न ‘जैसे थे’च राहणार आहे. ‘नव्या पार्किंग धोरणात अशा वस्त्यांचा एकतर विचार केलेला तरी नाही किंवा त्यांच्या पार्किंगच्या प्रश्नावर पालिकेकडे उत्तर तरी नाही’, अशी प्रतिक्रिया गोराईचे नगरसेवक शिवा शेट्टी यांनी व्यक्त केली.
‘इथल्या अरुंद गल्ल्यांमध्ये कचरा नेण्यासाठी घंटागाडीही येऊ शकत नाही. त्यातून दोन्ही बाजूला गाडय़ा ठेवल्या तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंदच होऊन जाईल. त्यामुळे, भाडय़ाच्या बदल्यात पार्किंगला परवानगी मिळूनही ही योजना या ठिकाणी व्यवहार्य ठरणारी नाही, ’ अशी प्रतिक्रिया चारकोप (दक्षिण) येथील नगरसेवक श्रीकांत कवठणकर यांनी व्यक्त केली. कवठणकर हे चारकोपमधील ‘प्रबोधनकार ठाकरे नगर को.हौ.युनियन’चे अध्यक्षही आहेत. या वस्त्यांमधील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी ते गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहेत. पण नव्या धोरणामध्येही येथील रहिवाशांना दिलासा दिलेला नाही, अशी त्यांची भावना आहे.
रस्त्यावर पार्किंग नकोच
आपण कोट शिवायचा म्हटला तरी आधी कापड किती लागेल याचा विचार करतो. दुर्दैवाने मुंबईतील गृहउद्योग धोरणात याचा विचारच केलेला नाही. आपण फक्त घरे बांधत सुटलो आहोत. हेच धोरण वाहनांच्या बाबतीत आहे. त्यामुळे मुंबई मोटारमय झाली आहे. ही सगळी वाहने सामावून घेणारे भाडेतत्त्वावरील वाहनतळ मुंबईत फारच कमी आहेत. त्यातून रस्त्यावर वाहनाला पार्किंगसाठी परवानगी देणे हेच मुळात चुकीचे आहे. रस्ता वाहतुकीसाठीच असला पाहिजे. त्यामुळे वाहन घेणाऱ्यानेच आपले वाहन ठेवायचे कुठे, याचा विचार करायला हवा.
-अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ