पंढरपूर शहरातील ऐतिहासिक यमाई तुकाई तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू केल्यानंतर या तलावावर परराज्यातून येणा-यापक्ष्यांची संख्या वाढली असून दुसरीकडे त्यांची शिकार मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्याचे उघड होत आहे.
नगरपरिषदेने या तलावाच्या सुशोभिकरणासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन तळय़ातील गाळ काढणे, भराव टाकणे, वृक्षलागवड केली. यामुळे तलावाच्या सौंदर्यात भर तर पडली तसेच येथे परराज्यातून येणा-यापक्ष्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. पण या पक्ष्यांची या तळय़ाच्या परिसरात काम करणा-यामजुरांकडूनच मोठय़ा प्रमाणात शिकार होऊ लागल्याचे उघड होत आहे.
 इंग्रजांच्या काळापासून पाणीपुरवठय़ासाठी या यमाई तुकाई तलावाचा उपयोग केला जात होता. या ऐतिहासिक तळय़ाचे सुशोभीकरणाचे काम नगरपरिषदेने गेल्या तीन-चार वर्षांपासून घेऊन मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड केल्याने परराज्यातून येणा-यारंगीत करकोचा, चमचा बदक, ठिबक्याचे बदक, पाणकोंबडय़ा, टिटवी धापटय़ा, ससाणे, सूर्यपक्षी आदी पक्षी येथे येऊ लागले आहेत, असे पक्षिनिरीक्षक गोविंद ऊर्फ बंडू सबनीस यांनी सांगितले. दरम्यान या तलावाच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात बांधकामे चालू असून, त्यावर काम करणा-यामजुरांची संख्याही मोठी आहे. हे कामगार तळय़ावर जमतात अन् पक्ष्याची शिकार करत आहेत, त्यामुळे दुर्मिळ अशा दर्शन घडणा-या पक्ष्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. याकडे नगरपरिषद व वन खात्याने तातडीने लक्ष देणे गरजेचे असून, शिका-यापासून दुर्मिळ पक्ष्यांचा बचाव करणे गरजेचे आहे.
याच तलावात पक्षी अरण्याची सोय करण्यात येणार आहे. येथे येणा-यापक्ष्यांची माहिती, नागरिक, वारकरी यांना व्हावी यासाठी या यमाई तुकाई तलावावर जे विद्युतखांब आहेत, त्यावर निसर्गयात्री संस्थेच्या वतीने फलक लावण्यात येणार आहेत, असेही पक्षिमित्र सबनीस यांनी सांगितले.
या तलावावर जर अशीच पक्ष्यांची शिकार होत राहिली तर पुढे पक्षी या तलावाकडे फिरकणारसुद्धा नाहीत. याकरिता या तलावावर सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. जे लोक, कामगार या पक्ष्याची शिकार करतील त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या तलावावर पहाटे जे लोक फिरण्यास येतात त्यांनी जर या शिका-यांना प्रतिबंध केला तर त्यांनाच धमकावले जाते. यासाठी ठोस उपाययोजना करून दुर्मिळ पक्ष्याचे जतन करणे गरजेचे आहे.