लग्नानंतर तीन महिन्यांतच घरामध्ये भूत आणि देवीदेवता दिसत असल्याचा कांगावा करून पत्नीने आपला छळ मांडला आहे, असा आरोप करणाऱ्या पतीची विवाहाच्या बंधनातून मुक्त करण्याची मागणी कुटुंब न्यायालयाने मंजूर केली. अशाप्रकारे त्रास देऊन पत्नीने त्याची मानसिक छळवणूक केल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने त्याला घटस्फोट मंजूर केला.
लग्नानंतर तीन महिन्यांनीच पत्नीने पती आणि सासरच्या मंडळीविरुद्ध छळवणूक केल्याचा आरोप करून पोलिसांत गुन्हा दाखल केला. तसेच तिने पतीकडून महिन्याचा देखभाल खर्च देण्याची मागणीही केली. तिच्या या त्रासाला कंटाळून अखेर पतीने कुटुंब न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज केला. ती भ्रमिष्ट झाली असून घरात सर्वत्र भूत दिसत असल्याचा कांगावा करीत असल्याचा आरोप त्याने घटस्फोट मागताना केला. घरात आपल्याला केवळ भूतच नव्हे, तर देवीदेवताही दिसतात आणि त्या आपल्याला घराच्या गच्चीतून उडी घेण्यास सांगत असल्याचा दावा ती करते, असेही पतीने घटस्फोट अर्जात म्हटले होते. याशिवाय लग्नानंतरच्या तीन महिन्यांत तिने आपले जगणे अक्षरश: नरक बनविले होते. ती आपल्या वागणुकीतून केवळ मानसिकच नव्हे, तर शारीरिक छळ करायची. तिने घर सोडले आणि घरच्यांविरुद्ध छळवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लग्नानंतर गोव्याला जाण्याची योजना आपण आखली होती. मात्र पत्नीने आपल्यासोबत येण्यास नकार दिला. घरातील कामे करण्यासही ती टाळाटाळ करीत असे आणि दिवसभर धार्मिक आणि आध्यात्मिक पुस्तके वाचण्यात घालवत असे. ती स्वत:ला आमच्या खोलीत कोंडून घेत असे. आपले आईवडील तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत तेव्हा ती त्यांच्यासोबत भांडत असे. घर सोडून गेल्यानंतर तर तिने अनेकदा आपल्या व आपल्या आईवडिलांविरुद्ध पोलिसांत तक्रारी केल्या, असे पतीने अर्जात म्हटले आहे.
पतीच्या घटस्फोट अर्जानंतर कुटुंब न्यायालयाने पत्नीला अनेकदा नोटीस बजावून आरोपांबाबत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. मात्र तिच्याकडून एकाही नोटिशीला उत्तर देण्यात आले नाही. अखेर न्यायालयाने पतीची बाजू आणि त्याने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे एकतर्फी निर्णय देत त्याची घटस्फोटाची मागणी मान्य केली.