लग्नानंतरच्या १३ वर्षांमध्ये पत्नीकडून या ना त्या कारणास्तव करण्यात येणारी छळवणूक आणि एके दिवशी तिने केलेली मारहाण या सगळ्याला कंटाळून अखेर काडीमोड मिळावा या मागणीसाठी धाव घेणाऱ्या ठाणे येथील ३२ वर्षांच्या तरुणाला कुटुंब न्यायालयाने नुकताच घटस्फोट मंजूर केला. पत्नीची पतीप्रतीची वागणूक शारीरिक व मानसिक क्रूरताच असल्याचे न्यायालयाने त्याची काडीमोडाची मागणी मान्य करताना नमूद केले.
नोव्हेंबर २००० मध्ये या दोघांचा विवाह झाला होता. परंतु लग्नाच्या दिवसापासूनच त्यांच्यात कुरबूरी सुरू झाल्या. सासू-सासऱ्यांसोबत राहणे तिला पसंत नव्हते. तिने त्याबाबत त्याला सांगितले आणि त्यावरून दोघांत कडाक्याचे भांडण झाले. शिवाय तो कापड गिरणीत नोकरीला असल्याने त्याला दोन शिफ्टमध्ये काम करावे लागे. परिणामी बऱ्याचदा तो घरी उशिरा येत असे. त्यावरूनही पत्नी आपल्याशी भांडण उकरून काढत असे, असा आरोप पतीने घटस्फोटासाठीच्या अर्जात केला होता. विभक्त राहण्यावरून होणारा वाद मिटविण्यासाठी अखेर आपण आईवडिलांपासून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि पत्नी व मुलांसह दुसऱ्या घरी राहू लागलो. मात्र त्यानंतरही पत्नीच्या वागणुकीत काहीच फरक पडला नाही. उलट एक दिवस ती रात्री उशिरा घरी आली. त्यामुळे तिच्या उशिरा येण्यामागील कारण आपण तिला विचारले असता ती संतापली आणि तिने भांडण्यास सुरुवात केली. ती एवढय़ावरच थांबली नाही, तर तिने आपले कपडे फाडले आणि आपल्या कानशिलात मारली. तिने आपल्या गुप्तांगावरही मारहाण केली. नंतर ती मुलांना आपल्याकडेच ठेवून घर सोडून निघून गेली, असा आरोप पतीने करत पत्नीची ही वागणूक मानसिक आणि शारीरिक क्रूरताच असल्याचा दावा केला. तसेच त्याआधारे घटस्फोट मंजूर करण्याची मागणी केली.
त्याच्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने पत्नीला वेळोवेळी नोटीस बजावून पतीने तिच्यावर केलेल्या आरोपांविषयी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. मात्र एकाही नोटिशीला तिने प्रतिसाद दिला नाही. परिणामी पतीने केलेल्या आरोपांना पत्नीकडून आव्हान वा काहीही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळेच पत्नीने त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा क्रूर वागणूक दिल्याचे स्पष्ट होते, असे नमूद करत न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2015 रोजी प्रकाशित
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीचा काडीमोड
लग्नानंतरच्या १३ वर्षांमध्ये पत्नीकडून या ना त्या कारणास्तव करण्यात येणारी छळवणूक आणि एके दिवशी तिने केलेली मारहाण या सगळ्याला कंटाळून अखेर काडीमोड मिळावा या मागणीसाठी धाव घेणाऱ्या
First published on: 28-05-2015 at 07:20 IST
TOPICSछळ
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband take divorce from his wife after harassment from her