वाळूज एमआयडीसीलगत पारधी पेढीवरील २५ झोपडय़ांना आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी आठजणांना अटक केली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास पारधी वस्तीवर सशस्त्र हल्ला करून २५ झोपडय़ा पेटवून देण्यात आल्या. जमिनीच्या वादावरून हा हल्ला झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिंदी सिरसगाव येथील गट क्रमांक ७०मध्ये १२० एकर गायरान जमिनीवर पारधी समाजाने अतिक्रमण केले आहे. ते नियमानुकूल व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. या जमिनीवर दलित समाजातील काही कार्यकर्तेही हक्क सांगत होते. त्याचा वादही न्यायालयात सुरू आहे.  रविवारी रात्री काहींनी झोपडय़ा पेटवून दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी भागीनाथ देवकाजी तुपे, नामदेव रामजी तुपे, संभाजी रामजी तुपे, पांडुरंग रामजी तुपे, किसन रामजी तुपे, बंधू रामजी तुपे, पुंडलिक रघुनाथ तुपे, ज्ञानेश्वर रघुनाथ तुपे या आठजणांना अटक केली.