मंत्री थोरात यांची सूचना
टंचाई स्थितीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ात प्रशासनामार्फत टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला. नरेगाच्या माध्यमातून मजुरांना मोठय़ा प्रमाणात कामे शेल्फवर मंजूर केली असून, गावातील १० मजुरांनी एकत्रित कामाची मागणी केल्यास त्यांना तात्काळ कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री अशोक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, की नरेगाच्या माध्यमातून नुसती कामे शेल्फवर न ठेवता ती मागणी करणाऱ्या मजुरांना तात्काळ कामे उपलब्ध होण्यासाठी गावांची वर्गवारी करून त्या पद्धतीने शेल्फवर कामे उपलब्ध ठेवावीत. या वर्गवारीमुळे कामांची मागणी करणाऱ्या मजुरांना तात्काळ काम उपलब्ध करून देणे सोयीचे होणार आहे.
शहरी मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य तो प्रयत्न करण्यात येईल. जिल्हय़ात जमिनीतील पाणीपातळीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे. टँकरची मागणी आल्यानंतर त्यास तात्काळ मंजुरी देऊन टँकर सुरू करावेत.
टँकरमधून पुरविण्यात येणारे पाणी शुद्ध असणे आवश्यक आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य उपाययोजना करावी. टँकरचे पाणी गाळून व शुद्ध करून घ्यावे. जिल्हय़ात पशुधन जगविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात छावण्या सुरू करण्यात येत असून भविष्यात ही संख्या वाढणार आहे. छावण्यांत चारा, पाणी योग्य प्रमाणात मिळण्यास नियोजनबद्ध कार्यक्रम घ्यावा. येत्या काळात चाराटंचाई उद्भवणार असल्याने परजिल्हा किंवा इतर जिल्हय़ांतून चारा मागविण्याचे नियोजन करावे. जनावरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरचा उपयोग करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.