पोलीस, पालिका तसेच सरकारी अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मारहाण करणे मला मान्य नाही. अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठवा, असे सातत्याने सांगणाऱ्या ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे ज्या दादरमध्ये राहतात तेथील मनसेच्या १८५ क्रमांकाच्या शाखेत दोन वर्षांपूर्वी अनधिकृत पोटमाळा बांधण्यात आला आहे. याच शाखेत गुरुवारी मनसेचे स्वीकृत नगरसेवक गिरीश धानुरकर यांनी पालिकेच्या एका कनिष्ठ अभियंत्याला बेदम मारहाण केली. या शाखेतील अनधिकृत बांधकामाबाबत जागामालकाने पालिकेकडे तक्रार करूनही आजपर्यंत पालिकेने हे बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली नाही.
धानुरकर यांच्यामुळे त्रस्त असलेल्या दादरमधील मनसेच्याच पदाधिकाऱ्यांनी धानुरकर यांच्या ‘दुकानदारी’चे किस्से पत्राद्वारे राज यांना कळवले आहेत. स्वीकृत नगरसेवक बनल्यानंतर पक्षाचे काम करण्याऐवजी धानुरकर काय करीत आहेत, हे राज ठाकरे यांनी पाहावे, असे दादरमधीलच मनसे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या अभियंत्यांनी कारवाई केली म्हणून आमदार राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी अभियंत्याला बेदम मारहाण केली तर तोंडी तक्रार देऊन फोन उचलत नाही, असे कारण देत शाखेत बोलावून कनिष्ठ अभियंत्याला मारण्याचा ‘पराक्रम’ धानुरकर यांनी केला. विधानभवनात आमदार राम कदम यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला मारताच राज ठाकरे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र अभियंत्याला मारहाण झाल्यानंतर त्यांनी अथवा पक्षाने कोणतीही अधिकृत भूमिका का जाहीर केली नाही, असा संतप्त सवालही पालिका अभियंत्यांकडून करण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी जशी एकी दाखवून ठोस कारवाई केली तशी कारवाई आता होणार का, असा प्रश्नही पालिका अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामासाठी आम्हाला जबाबदार धरायचे आणि कारवाईसाठी संरक्षणही द्यायचे नाही, असेच धोरण आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांचे असेल तर भविष्यात आम्ही काम कसे करायचे, असा संतप्त सवालही अभियंता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Aug 2013 रोजी प्रकाशित
दादरमधील मनसेच्या शाखेत अनधिकृत पोटमाळा!
पोलीस, पालिका तसेच सरकारी अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मारहाण करणे मला मान्य नाही. अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठवा,
First published on: 03-08-2013 at 12:32 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal attic make in office of mns in dadar