ठाण्यातील अवैध बस वाहतुकीला वैधतेची झालर पाघरण्याची प्रक्रिया अजून कागदावरही येत नाही, तोच ठाण्यात घोडबंदर ते रेल्वे स्थानक मार्गावर धावणाऱ्या बेकायदा बसेस पुन्हा एकदा बिनधोकपणे रस्त्यावर धावू लागल्या असून प्रवाशांच्या वाढत्या दबावाचे कारण पुढे करीत ‘आरटीओ’ अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी या ‘अवैध’ वाहतुकीकडे पद्धतशीरपणे डोळेझाक सुरू केली आहे. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या आदेशानुसार गेल्या आठवडाभरापासून ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे, हे लक्षात येताच महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी या अवैध बसेस ‘टीएमटी’ सेवेत सामावून घेणारा नवा ‘पॅटर्न’ अमलात आणण्याचा विचार सुरू केला आहे. असे असले तरी यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव अजून कागदावरही उमटलेला नाही. तसेच अवैध वाहतुकीला वैधतेचा दर्जा देण्यात काही तांत्रिक अडचणी असल्याचीही चर्चा आहे. तरीही आपल्या बसेस जणू वैध झाल्या, अशा आविर्भावात बसचालकांनी पुन्हा एकदा परिवहन विभागाच्या नाकावर टिच्चून घोडबंदर मार्गावरील सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, एरवी ‘टीएमटी’ उद्धाराची भाषा करीत इतके दिवस या वाहतुकीविरोधात आक्रमक भूमिका घेणारे डावखरे या वेळी अचानक मवाळ बनले असून बेकायदा वाहतूकदारांच्या मुसक्या आवळण्यामागील नेमका ‘डाव’ तरी काय होता, याची खमंग चर्चा आता ठाण्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून अवैध बस वाहतूक सुरू आहे. घोडबंदर भागातील शिवसेनेचा एक बडा नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचा या वाहतुकीला असलेला पाठिंबा काही लपून राहिलेला नाही. ‘टीएमटी’चा नाकर्तेपणा आणि रिक्षाचालकांची मुजोरी यामुळे प्रवासी मोठय़ा संख्येने या वाहतुकीचा आधार घेतात. त्यामुळे प्रवाशांचा कळवळा दाखवीत या बेकायदा वाहतूकीला गेल्या अनेक वर्षांपासून राजाश्रय दिला जातो. घोडबंदर मार्गावरील खासगी वसाहतींमधून रेल्वे स्थानकापर्यंत थेट प्रवासी वाहतुकीचे काही परवाने यापूर्वी ‘आरटीओ’ने दिले आहेत. तरीही थेट वाहतुकीऐवजी ‘थांबे’ घेत या बसेसचे बेकायदा मार्गक्रमण सुरू असते. याशिवाय कोपरी भागात या बसेस बेकायदा उभ्या केल्या जातात. इतके दिवस हे सगळे उघडय़ा डोळ्यांनी पाहणारे डावखरे यांनी अचानक ही अवैध वाहतूक बंद करण्याचे आदेश काढले आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही ते पाळावे लागले. सुरक्षेचे कारण त्यासाठी पुढे करण्यात आले. दुसरा ठोस पर्याय नसताना अचानक ही वाहतूक बंद पडल्याने प्रवासी गेल्या काही दिवसांपासून डावखरे यांच्या नावाने खडे फोडताना दिसत होते.
दबाव वाढला..डावखरे नमले
अवैध वाहतूक बंद होऊनही प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ‘टीएमटी’ पुढे सरसावली नाही, तसेच रिक्षा चालकांची मनमानीही कायम राहिली. त्यामुळे दररोज सकाळ-सायंकाळी प्रवाशांकडून दबाव वाढू लागला होता. परिवहन विभागाचे काही अधिकारी ही कारवाई करीत असताना डावखरे यांचे नाव सांगण्यास मागेपुढे पाहत नव्हते. त्यामुळे डावखरे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्यासोबत एक बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार झालेल्या प्राथमिक चर्चेत या अवैध बसेस ‘टीएमटी’ सेवेत सामावून घेण्याचा प्राथमिक प्रस्ताव पुढे आला. महापालिका प्रशासन यासंबंधीच्या प्रस्तावावर गेल्या महिनाभरापासून विचार करीत होते. या बैठकीमुळे हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आणि अवैध बस वाहतूकदारांनी काही नियमांची अंमलबजावणी करावी, असेही या बैठकीत ठरले.
महापालिकेत झालेल्या बैठकीच्या आधारे अवैध बस वाहतूक पुन्हा सुरू झाली असून गेल्या आठवडय़ात काही घडलेच नाही, या थाटात महामार्गाच्या कडेला या बसेस दिसू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे या बसगाडय़ांचे जथ्थे पुन्हा दिसू लागले असून या ठिकाणी वाहतूक कोंडीही होऊ लागली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलांच्या पायथ्याशी यापैकी काही बसेस उभ्या राहत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. असे असताना इतके दिवस या बस वाहतुकीच्या मागे हात धुवून लागलेल्या राजकीय नेत्यांनी आता मात्र सोयीस्कर मौन धारण केल्याने या कारवाईमागील नेमका ‘डाव’ काय होता, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
यासंबंधी ठाणे परिवहन विभागाचे प्रमुख मधुकर जाधव यांच्याकडे विचारणा केली असता अवैध बस वाहतुकीविरोधात कारवाई सुरूच आहे, असा दावा त्यांनी केला. महापालिकेत बैठक झाली असली तरी यासंबंधी कोणताही ठोस निर्णय होत नाही, तोवर ही कारवाई सुरूच राहणार, असा दावा त्यांनी केला.