नागपूर सुधार प्रन्यासच्या पार्किंग शुल्काच्या नावाखाली वाहनचालकांकडून बिनबोभाटपणे मोठी रक्कम वसुल करणाऱ्या टोळ्या शहरात सक्रिय झाल्याने सामान्य नागरिकांनी कोणाकडे धाव घ्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे नासुप्रने कोणालाही ‘पार्किंग कॉन्ट्रॅक्ट’ दिलेला नाही. तरीही अनेक ठिकाणी नागरिकांना लुबाडण्यात येत असून या टोळ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांचा बंदोबस्त नासुप्रने करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
व्हरायटी चौकातील उड्डाण पुलाखालील अपना भांडारच्या समोरील जागा, इटर्निटी मॉल, सक्करदरा, इतवारी, कॉटन मार्केट, एलआयसी चौक, मेडिकल चौक, धंतोली, बडकस चौक, मोरभवन, रविनगर, वर्धमान नगर आणि अन्य अनेक अतिव्यस्त भागात नागरिकांच्या मदतीसाठी ‘पार्किंग स्टँड’ उघडण्यात आले आहेत. या ठिकाणी १० रुपयापासून ५० रुपयापर्यंत पार्किंग शुल्क आकारले जाते. वाहनचालकांना देण्यात येणाऱ्या तिकिटावर नागपूर सुधार प्रन्यासचे नाव छापण्यात आले आहे. दररोज हजारो वाहने येथे पार्क केली जातात. त्यामुळे एका पार्किंग स्टँडवर एक दिवसाचे उत्पन्न १० ते २० हजार ते रुपयांपर्यंत जाते. अवैध पार्किंग स्टँडवर केली जाणारी एकूण लाखो रुपयांची दररोजची ही कमाई अखेर कोणाची?, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
या अवैध पार्किंगशी नासुप्रचा कोणताही संबंध नाही आणि याबद्दल नासुप्रच्या अधिकाऱ्यांकडे कोणतीही माहिती नाही, असे सांगून नासुप्रने हात झटकले होते. माहिती अधिकारात विचारणा झाल्यावर मात्र नासुप्रतर्फे असे कोणतेही पार्किंग स्टँड उभारण्यात आलेले नाहीत आणि कोणाशीही पार्किंग स्टँडसंदर्भात करार झालेला नाही, असे नासुप्रने स्पष्ट केले. त्यामुळे अजूनही नागरिकांकडून शुल्क वसुली करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पार्किंग तिकिटावर नासुप्रचे अधिकृत नाव कसे छापण्यात येते हेदेखील एक गूढच आहे.
नासुप्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यासंदर्भात पृच्छा केल्यानंतर त्यांनीही असा कोणताही पार्किंग स्टँड नासुप्रच्या मार्फत उभारण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. असे अवैध काम कोणी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर खटला भरण्याचे सूतोवाच त्यांनी केले. नागरिकांनीही सतर्क राहून अशा पार्किंग लुटीच्या विरोधात नासुप्र सभापतींकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन या अधिकाऱ्याने केले. नासुप्रने या पार्किंग लुटमारीशी संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे याचे सूत्रधार कोण या प्रश्नाचे उत्तर मिळवणे भाग पडणार आहे.