ठाणे शहरातील अनधिकृत बारविरोधात कडक मोहीम हाती घेण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले.  चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जबाबदारी निश्चित करण्याचा इशाराही त्यांनी दिला.  
ठाण्यातील ५२ लेडीज बारसंबंधीचा एक अहवाल मध्यंतरी ठाणे पोलिसांनी महापालिकेकडे सादर केला होता. या अहवालाच्या आधारे काही बारच्या बांधकामाविरोधात महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, बेकायदा बांधकाम असलेल्या लेडीज बारना अग्निशमन विभागाचा ‘ना हरकत’ दाखला दिला गेल्याची काही प्रकरणे यापुर्वी उघड झाली आहे.  दरम्यान, ‘लंच होम’च्या नावाखाली काही बार मालकांनी अग्निशमन विभागाचे परवाने पदरी पाडून घेतल्याचा आरोप  स्थायी समिती सभेत करण्यात आला होता. अशा बारविरोधात कारवाई करण्याची मागणीही यावेळी लावून धरण्यात आली होती. अखेर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिक्रमण विरोधी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले.