शहरात पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत महिनाभरात ३६० ठिकाणी जलवाहिन्यांची दुरूस्ती, १६५ व्हॉल्वची दुरूस्ती आणि ३१३ नळ जोडण्या बंद करण्यात आल्या आहेत. पाणी बचतीच्यादृष्टीने विविध उपाययोजना हाती घेतानाच दुसरीकडे गळती रोखण्यावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शहर परिसरात कुठेही पाणी गळती आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती दिल्यास तातडीने कार्यवाही केली जाईल, असे महापालिकेने म्हटले आहे.
संभाव्य दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर, शहरात सध्या पाणी कपात सुरू आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा या महापालिकेने केलेल्या आवाहनास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून पाणी पुरवठा विभागाने जलवाहिनी दुरूस्ती, व्हॉल्व दुरूस्ती तसेच नळ जोडणी बंद करण्याची कामे युद्ध पातळीवर हाती घेतली आहेत. त्या अंतर्गत पूर्व विभागात ३५ ठिकाणी जलवाहिनी तर १० ठिकाणी व्हॉल्व दुरूस्तीसह इतर कामे करण्यात आली. पश्चिम विभागात ३३ ठिकाणी जलवाहिनी तर पाच ठिकाणी व्हॉल्व दुरूस्ती, बंद केलेली नळ जोडणीसह इतर १० कामे करण्यात आली. पंचवटी विभागात ८३ जागी जलवाहिनी दुरूस्ती, ५ ठिकाणी व्हॉल्व दुरूस्ती, २८ नळ जोडण्या बंद करण्यात आल्या. सातपूर विभागात ३६ ठिकाणी जलवाहिनी व ११ व्हॉल्व तसेच सिडको विभागात सर्वाधिक म्हणजे ११८ ठिकाणी जलवाहिनी दुरूस्ती व १२४ ठिकाणी व्हॉल्व दुरूस्ती, तसेच २८१ नळ जोडण्या बंद करण्यात आल्या. नाशिकरोड विभागात ५५ ठिकाणी जलवाहिनी दुरूस्ती व १० व्हॉल्वची दुरूस्ती करण्यात आल्याचे या विभागाने म्हटले आहे. शहरातील एकुण सहा विभागात ३६० ठिकाणी जलवाहिनी तर १६५ व्हॉल्वची दुरूस्ती तसेच ३१३ नळ जोडण्या बंद करण्यासह ९४ ठिकाणी इतर दुरूस्तीची कामे करण्यात आली आहेत.
दरम्यान, पाणी बचतीच्या दृष्टीने गळती रोखण्यासाठी नागरीक विभागनिहाय महापालिकेला माहिती देऊ शकतात. शहर परिसरात कुठेही पाण्याची गळती दिसल्यास राजीव गांधी भवन तक्रार निवारण केंद्र ०२५३ – २५७३७०४, नाशिक पूर्व विभागात यू. डी. सोनवणे ९४२३१ ७९१४७, नाशिक पश्चिम जी. डी. मैंद ९४२३१ ७९१७९, पंचवटी आर. एम. शिंदे ८२७५० २२७६९, नाशिकरोड एन. के. पाटील ९४२२२ २२८४३, नवीन नाशिक ए. एस. नरसिंगे ९४२२२ २२८०३, सातपूर ए. व्ही. जाधव ९४२३१ ७९१५३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2013 रोजी प्रकाशित
पाणी गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम
शहरात पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत महिनाभरात ३६० ठिकाणी जलवाहिन्यांची दुरूस्ती, १६५ व्हॉल्वची दुरूस्ती आणि ३१३ नळ जोडण्या बंद करण्यात आल्या आहेत.

First published on: 04-04-2013 at 01:37 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immediate action on water leakage