दरोडा घालण्याच्या तयारीत असताना पकडले गेलेल्या टोळीतील संशयितांना न्यायदंडाधिकाऱ्यांकडून पोलीस कोठडी मिळाल्याने पोलीस ठाण्याकडे नेत असताना वाटेत पोलिसांवर हल्ला चढवून व सरकारी जीप उलटून लावून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पाच आरोपींना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.
सचिन संभाजी जाधव (वय ३१), रवी गंगाराम गायकवाड (वय २२), संतोष मुरलीधर वाघमारे (वय २१), नितीन हरी गुंजाळ (वय२२) व शब्बीर साहेबलाल मुजावर (वय २४, सर्व रा. भाळवणी, ता. पंढरपूर) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा घालण्याच्या तयारीत असताना या सर्वाना संशयित म्हणून पकडण्यात आले होते. १० डिसेंबर २०११ रोजी गुन्हा दाखल होऊन सर्वाना माढा येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून पोलीस कोठडी मिळविण्यात आली होती. नंतर तेथून पोलीस ठाण्याकडे परत आणत असताना वाटेत पिंपळनेर येथे अचानकपणे या सर्व आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. पोलीस जीप उलटून लावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. मात्र त्याचवेळी पाठीमागे असलेल्या वाहनातील बापूराव गायकवाड (रा. अंबाड) व इतरांनी आरोपींना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याप्रकरणी या आरोपींविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांच्यासमोर झाली.यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आरोपींना दोषी धरले, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. धनंजय माने यांनी बचाव केला.