नवी दिल्ली येथील सामुदायिक बलात्कारात मृत्यू पावलेल्या पीडित युवतीला न्याय मिळावा, बलात्कार करणाऱ्या नराधमांवर मानवी मृत्यूचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी आंबेडकरी समाज, पक्ष, संघटना, जनआंदोलन या संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच कंॅडल मार्च काढून पीडित युवतीला आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजल्यावर कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सामजिक कार्यकर्त्यांतून व संघटनांतूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत राहिल्या. याच प्रश्नावरून आज आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलन या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी ३ वाजता निदर्शने केली. २ तासाहून अधिक काळ पीडित युवतीला न्याय मिळावा, या मागणीसाठी घोषणा दिल्या जात होत्या. पोलिसांच्या परवानगीनंतर आंदोलकांना अपर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांना भेटण्यास परवानगी देण्यात आली. कार्यकर्ते कॅं डल मार्च करीत कार्यालयात पोहोचले. धुळाज यांना दिलेल्या निवेदनात पीडित युवतीला न्याय मिळण्यासाठी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी, पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करावे, महिलांवर अत्याचाराचा कायदा कठोर करावा, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आरपीआय आठवले गटाचे प्रदेश सचिव प्रा.शहाजी कांबळे, सरचिटणीस सुखदेव बुध्दीहाळकर, रूपा वायदंडे, प्रा.पी.डी.सावंत, अविनाश अंबपकर, गुलाब शिर्के, प्रताप बाबर, सोमा कांबळे, निर्मला धनवडे, मलिक चिकदून आदींनी केले