कोल्हापूर जिल्ह्य़ातील महिलांवरील बलात्कार, आत्महत्या, विनयभंग, छळ यासारख्या गुन्हेगारीघटनांचा आलेख या वर्षी वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेने यासर्व प्रकारच्या गुन्ह्य़ामध्ये वाढच झाली आहे. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी रविवारी दिलेल्या माहितीतून महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या प्रकारावर प्रकाशझोत पडला आहे.
३१ डिसेंबरच्या पोलीस बंदोबस्ताची माहिती देत असताना महिलांवरील अत्याचाराचा विषय पुढे आला. त्या संदर्भात जाधव यांनी, या वर्षी व गतवर्षीची आकडेवारी सादर केली. या वर्षीच्या नोव्हेंबरअखेर जिल्ह्य़ात बलात्काराचे ४५ प्रकार घडले. तर गतवर्षी ३९ घटना घडल्या होत्या. यंदा ५२ विनयभंगाचे गुन्हे घडले. तर गतवर्षी ४९ घडल्याच्या नोंद आहेत. महिलांच्या छळाचे १२८ प्रकार उघडकीस आले असून गतवर्षी हा आकडा १०९ इतका होता. विवाहितांच्या आत्महत्येमध्ये एकाने वाढ झाली आहे. १८ विवाहितांनी या वर्षी आत्महत्या केल्या. विवाहितांना आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या २१ घटनांची नोंद झाली आहे. तर गतवर्षी असे १५ गुन्हे उघडकीस आले होते.    
महिलांवरील अत्याचाराच्या कोणत्याही तक्रारी आल्या, तरी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची तत्काळ दखल घ्यावी. आरोपी कोण आहे याची मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाई करावी, असा आदेश सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे जाधव यांनी सांगितले.