व्यवस्थापनाच्या सर्व अभ्यासक्रमात, विशेषत: एमबीएमध्ये विद्यार्थ्यांना केवळ ‘सी-मॅट’ परीक्षेमार्फतच प्रवेश मिळेल, असे सांगून अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेने या परीक्षेबाबतचा संभ्रम दूर केला आहे.
एमबीएसारख्या व्यवस्थापन अभ्यासक्रमात ‘कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट’ (सी-मॅट)द्वारेच प्रवेश दिला जाईल. तथापि कॅट, मॅट, एक्सॅट, एटीएमए आणि जेएमईटी यासारख्या प्रवेश परीक्षांमधील कामगिरीही विचारात घेतली जाईल. केवळ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) आणि इतर अभिमत विद्यापीठांना यातून वगळले जाईल. याशिवाय इतर कुठल्याही प्रवेश परीक्षांचा व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी विचार केला जाणार नाही, असे एआयसीटीईचे अध्यक्ष एस.एस. मंथा यांनी सांगितले. सी-मॅट ही परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणेच ऑनलाईन घेतली जाणार असून सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी दिली आहे. ही परीक्षा सहा महिन्यांच्या अंतराने वर्षांतून दोनदा घेतली जाईल आणि विद्यार्थ्यांना दोन्हीवेळा परीक्षा देण्याची मुभा राहील. प्रवेशासाठी दोन प्रयत्नांमधील सर्वाधिक गुण विचारात घेतले जातील. कुठल्या शहरातून परीक्षा द्यायची आहे याबाबत विद्यार्थ्यांना तीन पर्याय दिले जातील. सर्व राज्यांनी सी-मॅटसाठी त्यांची संमती दिली आहे. व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका (पीजीडीएम) आणि एमबीए अभ्यासक्रम चालवणाऱ्या ३७०० संस्थांमधील सुमारे साडेतीन लाख जागा २१ ते २५ फेब्रुवारी २०१३ दरम्यान होणाऱ्या सी-मॅट परीक्षेमार्फत भरल्या जातील. यापैकी ३०० महाविद्यालयांमधील सुमारे २० हजार जागा पीजीडीएमच्या आहेत, असे मंथा म्हणाले.
ज्या विद्यार्थ्यांनी सी-मॅट किंवा व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका यासाठीच्या इतर पाच परीक्षा यापैकी कुठलीही परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांना त्यांनी इशारा दिला. अशा विद्यार्थ्यांना अपात्र मानण्यात येऊन त्यांच्या पदवीला मान्यता दिली जाणार नाही हे मंथा यांनी स्पष्ट केले.
२०१३-१४ या शैक्षणिक सत्रापासून पीजीडीएम, पीजीडीबीएम, एमएमएस आणि एमबीए अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ सी-मॅट मार्फतच प्रवेश दिला जावा, असे राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने काढलेल्या अधिसूचनेत स्पष्ट केले होते. संचालनालय घेत असलेली एमएएच-एमबीए / एमएमएस-सीईटी ही परीक्षा यावर्षीपासून रद्द करण्यात आली असल्याचे तंत्रशिक्षण संचालक सुभाष महाजन यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. व्यवस्थापन प्रवेशासाठी पात्र ठरण्याकरता इच्छुकांनी सी-मॅट परीक्षा द्यावी, असे आवाहन संचालनालयाने केले आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ऑनलाईन सी-मॅट परीक्षेला विदर्भातील सुमारे ५०० विद्यार्थी बसले होते.
विदर्भासाठी तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकच केंद्र होते. यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या भरमसाट वाढणार असल्यामुळे परीक्षा केंद्रांचीही संख्या वाढण्याची शक्यता
आहे.  सी-मॅट परीक्षेचे माहितीपत्रक १२०० रुपयांना (राखीव वर्गासाठी ६०० रुपये) उपलब्ध असून ते भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमधून विकत घेता येऊ शकते. विद्यार्थ्यांना ते एआयसीटीईच्या संकेतस्थळावरही पाहायला मिळू शकते.
या परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया २ जानेवारीला संपणार आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश अर्ज डाऊनलोड करता येतील. २१ ते २५ फेब्रुवारीपर्यंत परीक्षेची ‘विंडो’ खुली राहणार असून १३ मार्चला निकाल जाहीर करण्यात येईल.