स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथील प्रीतिसंगमावरील कृष्णा घाटावर  सोमवारपासून (दि. १७) सुरू होणाऱ्या अखिल भारतीय कीर्तन संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
संत सखूच्या विठ्ठलभक्तीने भावविभोर झालेल्या कराडकर रसिकांना आणि भगवत्भक्तांना कीर्तन संमेलन ही फार मोठी परमार्थिक मेजवानी ठरणार आहे. कीर्तन कुलाचे कुलश्रेष्ठ स्वामी सच्चिदानंद सरस्वती हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
१७ ते १९ डिसेंबर या चार दिवसांत रंगणाऱ्या संमेलनात महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक कीर्तनकारांची रामदासी, वारकरी, नारदीय कीर्तने, ‘अवघा रंग एक झाला’ हा भजन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. याचबरोबर अशा अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. कीर्तन संमेलनात विविध भाषांतील कीर्तने हे वैशिष्टय़ असणार आहे. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी, कानडी, संस्कृत, गुजराथी भाषांतील कीर्तने होणार आहेत. त्याचीही मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे.
संमेलनात बंडातात्या कराडकर आणि बाबामहाराज सातारकर यांची कीर्तने होतील. संमेलनाचा समारोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या हस्ते व बाबामहाराज सातारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
कीर्तन संमेलनात कीर्तनकारांचा विशेष पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात येणार आहे. त्यात जमखंडीचे नारायणशास्त्री गोडबोले यांना कीर्तनाचार्य, डोंबिवलीचे आनंदबुवा जोशी यांना कीर्तनश्री, पुण्याचे मोरेश्वरबुवा जोशी यांना कीर्तनभूषण, पुण्याच्या मंजुश्री खाडिलकर यांना कीर्तनचंद्रिका, नरसोबाचीवाडीचे दत्तदासबुवा घाग यांना कीर्तनमरतड आणि बंडातात्या कराडकर यांना कीर्तनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.
कीर्तनाच्या उज्ज्वल परंपरेची प्रतिष्ठा जोपासून देवर्षी नारदांच्या देवकार्याचे, संत ज्ञानदेवांच्या धर्मकीर्तनाचे, नामदेवांच्या जगी ज्ञानदीप लावण्याच्या संकल्पाचे, तुकारामांच्या समाजजागृतीचे, एकनाथांच्या हरिकीर्तनाची मर्यादा सांभाळण्याचे आणि समर्थ रामदासांच्या देशकार्याचा मंत्र घरोघरी पोहोचविण्याचे दृढव्रत घेऊन भविष्यकाळातील मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणा देणारे कराडचे कीर्तन संमेलन होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.