देशाच्या आर्थिक विकासात आयकर विभागाचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कोराडी मार्गावरील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे आयोजित भारतीय राजस्व सेवेच्या ६८व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अकादमीच्या महासंचालक गुंजन मिश्रा, अतिरिक्त महासंचालक आर.के. चौधरी, मदनेश मिश्रा, संचालक सुनील उमाप, सहायक संचालक लियाकत अली यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्या देशात करप्रणाली कार्यक्षमतेने राबवली जाते ते देश झपाटय़ाने राष्ट्रीय आर्थिक इष्टांक साध्य करतात. लोकशाहीत कर विभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्णपणे कर विभागाने दिलेले कराचे उद्दिष्ट पूर्ण केल्यावर हा निधी केंद्राकडे जातो. केंद्रामार्फतच विविध विकास कामासाठी त्यातून राज्यांना तो निधी मिळतो. देशाच्या व राज्याच्या आर्थिक विकासात कर विभागाचे योगदान मोठे आहे. कार्यक्षम कर विभागामुळेच कर चुकवेगिरीला आळा बसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजात आर्थिक गुन्हे घडू शकतात. प्रशिक्षित अधिकाऱ्यांनी अशी आर्थिक गुन्हेगारी उघडी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी. आर्थिक गुन्हे रोखण्याचे तसेच करचुकवेगिरीचे समूळ उच्चाटन करणे, हे देशापुढील प्रमुख आव्हान आहे. प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेतलेल्या आयकर अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात तडजोड न करता नैतिक मूल्यांची कास धरावी. नैतिक विकासाशिवाय भौतिक विकासाचा पाया कच्चा राहतो, असेही ते म्हणाले. महासंचालक गुंजन मिश्रा यांनी प्रास्ताविक केले तर धनंजय वंजारी यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2014 रोजी प्रकाशित
देशाच्या विकासात आयकर विभागाचे महत्त्वाचे योगदान – मुख्यमंत्री
देशाच्या आर्थिक विकासात आयकर विभागाचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
First published on: 30-12-2014 at 07:27 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax department important contribution to the development of the countrys chief minister