पारपत्र काढण्यासाठी स्थानिक पातळीवर सेवा केंद्राची उभारणी झाली असली तरी या ठिकाणी स्थानिकांऐवजी ठाणे, रायगड व नवी मुंबईतील नागरिकांची एकच रीघ लागल्याने उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना विहित प्रक्रिया पूर्ण करताना कालापव्यय सोसावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. पारपत्रच्या ठाणे विभागीय कार्यालयाने आपला ताण कमी करण्यासाठी उपरोक्त भागातील नागरिकांना नाशिक सेवा केंद्राचा पर्याय उपलब्ध करून दिला; परंतु ही बाब उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अडचणीची ठरल्याचे दिसते, कारण केंद्र सुरू झाल्यावर अगदी पाच ते आठ दिवसांत कागदपत्र सादर करण्यासाठी अर्जदारांना मिळणारी तारीख आता २५ ते ३० दिवसांनंतर उपलब्ध होते. दुसरीकडे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने लहान मुले, महिला व संपूर्ण कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
साधारणत: वर्षभरापूर्वी नाशिक येथे पारपत्र सेवा केंद्राची सुरुवात झाली होती. तत्पूर्वी नाशिककरांना ठाण्याच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयाकडून तो मिळविणे क्रमप्राप्त ठरले होते. त्यासाठी बराच ‘द्राविडी प्राणायाम’ करावा लागत असल्याने या सेवा केंद्राच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर व्यवस्था झाल्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला. नाशिकसह धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील नागरिकांना या ठिकाणी पारपत्र मिळविण्याची सुविधा उपलब्ध झाली. आधी पारपत्र काढण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही बचत झाली; परंतु या सेवा केंद्रावरील भार आता चांगलाच वाढला असून प्रारंभी महिनाभरात मिळणारे पारपत्र आता बऱ्याच विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचे कारण, या केंद्रात ठाणे, रायगड व नवी मुंबईतील नागरिकांची होऊ लागलेली गर्दी.
ठाणे पारपत्र कार्यालयाच्या अखत्यारीत हे सेवा केंद्र आहे. या विभागाशी संलग्न आणखी एक केंद्र ठाणे येथे आहे. त्या केंद्रावर प्रचंड ताण असल्याने या विभागाने ठाणे, नवी मुंबई, रायगड या भागांतील नागरिकांसाठी नाशिक केंद्राचा पर्याय स्वीकारण्याची व्यवस्था उपलब्ध केली.
ठाणे केंद्राच्या तुलनेत नाशिक केंद्रात अर्जदारांची संख्या कमी असल्याने हा पर्याय उपलब्ध केला गेला; परंतु वर्षभरानंतर स्थानिकांसाठी तो अडचणीचा ठरला आहे. पारपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने कागदपत्र सादर करण्यासाठी तारीख दर्शविली जाते. ही तारीख सोयीस्कर वाटल्यास अर्जदार पैसे भरू शकतो. प्रारंभीच्या काही महिन्यांत नाशिक केंद्रात कागदपत्र सादर करण्यासाठी सात ते आठ दिवसांच्या आतील तारीख मिळत असे; परंतु आता २५ ते ३० दिवसांपुढील तारीख मिळते. म्हणजे आधी जी प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होऊन पारपत्र हाती पडायचे त्याचाही कालावधी लांबला आहे.
ठाणे, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातून नागरिकांना ठाणे केंद्रात ही तारीख त्यापेक्षा विलंबाने मिळते. यामुळे त्या भागातील नागरिक या केंद्राला पसंती देत आहेत. याचा परिणाम या केंद्रावर कामाचा ताण वाढण्यात झाला. बुधवारी या कार्यालयात उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांपेक्षा ठाणे, नवी मुंबई व भिवंडी येथील नागरिकांची अधिक गर्दी होती. रायगड, रत्नागिरी परिसरांतील नागरिकही या ठिकाणी येतात. कामाचा बोजा वाढल्याने साहजिकच या प्रक्रियेत कालापव्यय होत आहे. या संदर्भात कार्यालयातील अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काही टिप्पणी करण्यास नकार दिला. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसाठी साधी बसण्याचीही केंद्राबाहेर व्यवस्था नाही. पायऱ्यांवर नागरिक कित्येक तास लहान मुलांना घेऊन उभे राहतात. उभे राहण्यासाठी जागा नसल्यास आवारातील झाडाच्या सावलीत त्यांना उभे राहावे लागते.
मुंबईत पारपत्र काढायचे म्हणजे कागदपत्र सादर करण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी जातो. यामुळे सर्वसाधारण प्रक्रियेत व कमी खर्चात अल्पावधीत हे काम होईल म्हणून आपण नाशिक केंद्राचा पर्याय निवडला.
संदीप दीक्षित (मुंबई)
आपणास तात्काळ पारपत्र काढायचे आहे, पण ठाणे कार्यालयात त्यासाठी बरेच दिवस तिष्ठत राहावे लागते. यामुळे आपण नाशिक केंद्र निवडले. या केंद्रात लवकर कागदपत्र सादर करण्याची तारीख मिळाली.
विरेंद्र भगत (भिवंडी)